चित्रविचित्र आघाड्या,पक्षांतराचा गोंधळ कोणाचा पक्ष कोणता अन कोण कोणत्या गटात हेच कळेना कार्यकर्त्यांना राजकीय पक्षांचे पर्याय निर्माण झाल्याने स्थिती

चित्रविचित्र आघाड्या,पक्षांतराचा गोंधळ
कोणाचा पक्ष कोणता अन कोण कोणत्या गटात हेच कळेना
कार्यकर्त्यांना राजकीय पक्षांचे पर्याय निर्माण झाल्याने स्थिती
संचार वृत्त अपडेट
महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपासाठी चाललेली रस्सीखेच, जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी धरलेला आग्रह, घेतलेली परस्परविरोधी भूमिका, यातून उदयास आलेल्या चित्र-विचित्र आघाड्या, उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छुकांनी एका रात्रीत केलेले पक्षांतर यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण कुठे आहे हेच समजेना झाले आहे. त्यामुळे यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यात गोंधळाचे चित्र दिसत आहे.
पूर्वी ग्रामीण राजकारणात काँग्रेस हा एकमेव मोठा आणि प्रभावी पक्ष होता. विरोधी पक्ष फारसे सक्षम नव्हते. शिवसेना हा एक पर्याय असला तरी ग्रामीण भागात याचा प्रभाव मर्यादित होता. मात्र गेल्या दोन दशकांत ग्रामीण राजकारणाचा चेहरामोहराच बदलला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलू लागली. भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागापर्यंत आपली संघटनात्मक पाळेमुळे रुजवली. काँग्रेसमध्ये संधी न मिळालेल्या अनेक कार्यकत्र्यांसाठी भाजप हा सक्षम पर्याय ठरला. त्याचवेळी शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली नवीन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांनी दुसरी राष्ट्रवादी स्थापन केली. यामुळे कार्यकर्त्यांसमोर आणखी राजकीय पर्याय खुले झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सोयीच्या राजकारणाचे नवे प्रयोग सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीची (श.प.) राष्ट्रवादी (अ.प.)आघाडी पाहावयास मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे आघाडी, काही ठिकाणी या आघाड्यांना विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्यांनी मान्यता देखील दिली आहे.अपक्ष पण लढताना दिसत आहेत. याशिवाय जागा वाटपात ज्या पक्षाला जागा मिळाली, त्याच पक्षात प्रवेश करून इच्छुक उमेदवारांची ‘सोय’ केली जात असल्याचेही दिसत आहे. काही ठिकाणी पदे भूषविलेले पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सोयीसाठी काही ठिकाणी अपक्ष म्हणून लढत आहेत. काही ठिकाणी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपली नवीनच आघाडी स्थापन केली आहे या आघाड्यांना विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्यांनी मान्यता देखील दिली आहे.
या घडामोडींमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण गोंधळाचे झाले आहे. विचारधारांपेक्षा व्यवहार, निष्ठापेक्षा संधीला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र सध्या माळशिरस तालुक्यात दिसून येत आहे.
२७ जानेवारी अर्ज माघार घेण्याची तारीख असल्याने या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार असून मतदाराचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
• जागावाटपातून विचित्र व अनपेक्षित राजकीय आघाड्या
• उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांचे एका रात्रीत पक्षांतर
• जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत प्रथमच अशी परिस्थिती
• बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था
• कार्यकर्त्यांना राजकीय पक्षांचे पर्याय निर्माण झाल्याने स्थिती
• सोयीच्या राजकारणातून हव्या तशा आघाड्या



