मेडिकल असोसिएशन तर्फे तालुक्यातील सर्व डॉक्टर्सचा बंद यशस्वी
माळशिरस तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे तालुक्यातील सर्व डॉक्टर्संनी कडक बंद पाळला
कोलकाता येथील घडलेल्या घटनेचा कॅन्डल मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
संचार वृत्त
संग्रामनगर(संजय लोहकरे यांजकडून)९ ऑगस्ट २०२४ च्या पहाटे कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.यामुळे डॉक्टर्सच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अति महत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.तेव्हापासून आपल्या फार पूर्वीपासून प्रलंबित सुरक्षे संदर्भातील न्याय मागण्यांसाठी निवासी डॉक्टर्स देशव्यापी संपावर गेले आहेत. आयएमए तर्फे ही देशभरात निदर्शने आणि कॅन्डल मार्च काढण्यात आले आहेत.आर जी कार महाविद्यालतील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची परिस्थिती अतिशय हलगर्जीपणे, निष्काळजीपणे हाताळली आणि पहिल्या दिवसानंतर तर पोलिस तपासही जाणीव पूर्वक रखडवला गेला आहे.जेणे करून या प्रकरणातील हाय प्रोफाईल गुन्हेगार सुटतील.मात्र अखेर १३ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना आतापर्यंतच्या तपासावर असमाधान व्यक्त करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविण्यास सांगितले आहे.राज्य पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
१५ ऑगस्टला भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना.त्याच दिवशी मोठ्या जमावाने या रुग्णालयाच्या विविध विभागांची फक्त तोडफोडच नाही केली तर ज्या सेमिनार रुममध्ये पिडीत निवासी डॉक्टरचा निर्घृण बलात्कार व हत्या केली गेली.तेथील पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या जमावाने केला.एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही हल्ला केला.ऐवढे अपुरे होते की काय भरती असलेल्या रूग्णांना तसेच भरती रूग्णांसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीला सुध्दा प्रचंड मोठी हानी पोहोचविली.डॉक्टर्स विशेषत: स्त्री डॉक्टर्स हिंसाचाराला वारंवार बळी पडतात.रुग्णालये आणि कॅम्पसमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे.मात्र डॉक्टर्सच्या सुरक्षेबाबत संबंधित ह्या अधिकाऱ्यांच्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार शारीरिक हल्ले होतात. रूग्णालयामध्ये राडे होत असतात.
😭
कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील निवासी स्री डॉक्टरवर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर आज देशव्यापी निषेध दिन पाळून सकाळी ६ वाजेपासून ते उद्या रविवार सकाळी ६ वाजेपर्यंत वैद्यकीय शास्त्राच्या डॉक्टरांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.परंतु समाजाची कुठलीही अडचण होऊ नये यासाठी सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या होत्या.अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली गेली.
आज संध्याकाळी ७ वाजता सदुभाऊ चौक अकलूज या ठिकाणाहून मुक कॅण्डल मोर्चा पार पडला त्या ठिकाणी डॉ. संतोष खडतरे डॉ.रेवती राणे डॉ.वैष्णवी शेटे,डॉ.अंजली कदम डॉ.दिलीप पवार डॉ.जयंत चव्हाण,डॉ.विनोद शेटे इत्यादी मनोगत् व्यक्त केले.अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर श्री निंभोरे साहेब यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले.मोर्चाची सांगता २ मिनिट शांतता पळून श्रद्धांजली अर्पण करून झाली.
या कॅन्डल मोर्चोमध्ये आय एम ए अकलूज,आय.एम. ए.महिला संघटना,निमा अकलूज संघटना,निमा महिला संघटना, माळशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना, महिला होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना सहभाग झाल्या होत्या.हा मोर्चाच्या यशस्वी करण्यासाठी आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ.संजय सिद,डॉ. नितीन राणे,डॉ.संतोष खडतरे, डॉ.नितीन एकतपुरे,डॉ. रेवती राणे,निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे व डॉ.अंजली कदम माळशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजेभोसले आणी डॉ.वैष्णवी शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले.