माळशिरस तालुक्यातील बेरोजगारांचा हिरमोड
माळशिरस तालुक्यातील बेरोजगारांचा हिरमोड
सदाशिवनगर एमआयडीसी मंजूर यादीत नसल्याने निराशा
संचार वृत्त अपडेट
राज्य सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील चार औद्योगिक वसाहतीना मंजुऱ्या मिळाल्या, मात्र प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी आदी अनेक सोपस्कार पार केलेल्या सदाशिवनगरच्या औद्योगिक वसाहतीचे मात्र या यादीत नाव नसल्याने माळशिरस तालुक्यातील बेरोजगारांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.
माळशिरस तालुक्यात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक दिवसापासून औद्योगिक वसाहतीची मागणी होत आहे. यापूर्वीही पिसेवाडी, कोथळे या परिसरात ही वसाहत होणार असल्याच्या चर्चा झाल्या, मात्र त्यामध्ये पुढे प्रगती झाली नाही. माळशिरस तालुक्यात भाजपचे विधानसभा व विधान परिषद असे दोन आमदार असताना तालुक्यातील बेरोजगारांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे
अशी अपेक्षा होती. गेल्या वर्षी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सदाशिवनगर येथील शेती महामंडळाच्या उर्वरीत क्षेत्रावर औद्योगिक वसाहत उभारण्याची मागणी केली.
या प्रस्तावात आमदार रणजितसिंह मोहिते-पार्टील यांनी या औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाच्या सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव या गावातील सलग २१० एकर जमीन उपलब्ध असल्याचे दाखवून दिले. २०११ चे जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ४ लाख ८५ हजार ६४५ असून दिवसेंदिवस तालुक्यातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचेही दाखवून दिले आहे. मंत्रिमंडळाची शेवटची कॅबिनेट होऊन त्यामध्ये अनेक विषयांबरोबरच चार औद्योगिक वसाहती मंजूर झाल्या. त्याचवेळी आपलीही मंजूर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील तरुणांना होती.
जागेची पाहणी झाली.
मंत्री उदय सामंत यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार प्रस्ताव दिला. २ महिन्यापूर्वी राज्याच्या उद्योग मंत्रालयाच्या पथकाने येऊन प्रस्तावातील जागेची प्रत्यक्ष पाहणीही केली आहे.