solapur

आत्ताची तरुणाई चाललीये तरी कुठे?

आत्ताची तरुणाई चाललीये तरी कुठे?

संचार वृत्त अपडेट
तरुण म्हंटला की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सळसळत आणि धगधगतं तरुण रक्त ज्यामधे लाथ मारेल तिथून पाणी काढण्याची धमक असते..!! ज्याच्या जिभेतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला धारदार शब्दाची पात असते,देश ज्याच्या जीवावर उद्याच्या विकासाची स्वप्ने पाहतो तो तरुण…!!! पण काल एकच दिवशी काही बातम्या वाचण्यात आल्या,पहिली होती की आईने पैसे दिले नाहीत व शेतात जा काम कर असं सारखं सांगते म्हणून 24 वर्षाच्या तरुण पोराने स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून केला..आणि दुसरी बातमी होती की एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर बलात्कार केला…तर त्याच्याच खाली तिसरी बातमी होती की आंतरजातीय विवाह केला म्हणून भर रस्त्यात एका युवकाचा खून केला,हे सगळं वाचल्यावर आश्चर्याने अंगावर काटा आला आणि पायाखालची जमीन सरकली,मन सुन्न झालं आणि प्रश्न पडला की तरुण समाज चाललाय तरी कुठे??
मित्रांनो,या सगळ्या बातम्या वाचण्याअगोदर मी स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचलं होतं…!!मनात प्रश्न निर्माण झाला की ज्या स्वामी विवेकानंद म्हंटले होते की मला फक्त १०० तरुण दया मी या राष्ट्राचं भवितव्य घडवून दाखवतो..आणि आज त्याचं स्वामींच्या देशात अशा घटना घडतातच कशा?? खरंतरं आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर आपल्या देशाचा इतिहास फार मोठा घडला आहे तो तरूणांमुळेच…!! जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा तेव्हा तरुण एक झाले आणि संकट परतून लावली…!! संत ज्ञानेश्वर महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मंगल पांडे, सावरकर, भगतसिंग,राजगुरू,सुखदेव अशा अनेकांकडे पाहिलं की आपल्या भारताच्या जाज्वल्य इतिहासाचा अभिमान वाटतो..!!! पण आज मात्र खूप वाईट वाटतंय की थोर महापुरुषांचा इतिहास घेऊन जगणारी आजची पिढी इतकी कशी काय भरकटली..??आजच्या तरुण पिढीला तरुण म्हणायलासुद्धा लाज वाटते कारण आजची तरुणाई दिसते ती दारू,ड्रग्स,सिगारेट, यासारख्या अनेक वाईट व्यसनात बुडालेली,म्हातारे आईवडिलांची सेवा करायला नको म्हणून त्यांना वृद्धाश्रमात पाठवणारी…!!
सध्या पाहिलं तर तरुण पिढी ही धर्मभेद,जातीभेद या सगळ्यांमध्ये अशी अडकली आहे की थोर महापुरुषांना सुध्दा वाटून घ्यायला निघालीय शिव जयंतीला फक्त शिवभक्तांनीच एकत्र यायचं आणि भिम जयंतीला फक्त भीमसैनिकांनीच एकत्र यायचं त्यांना वाटून घेणारे आपण कोण,हा प्रश्न एकदातरी स्वतःला विचारून बघा…!! मोठे मोठे गडकिल्ले जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अस फर्मान काढलं का की,या किल्ल्यांवर फक्त आणि फक्त मराठाच येईल किंवा बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी जे कार्य केल तेव्हा ते म्हणाले का की याचा लाभ फक्त महारच घेतील…नाही ना!! वरवर हा जातीभेद प्रकर्षाने दिसून येतो तो म्हणजे शिवजयंती आणि भिमजयंतीला!! जयंती आली की गल्लीतल्या १०-१५ जणांनी एकत्र यायचं आणि एकच गाणं ज्यांची जयंती आहे त्याचं गाणं वाजवायचा आणि नंतर आपल्याला आवडतील ती गाणी लाऊन दारू पिऊन डीजेवर नाचायचं..!!सगळेच तरुण तरुणी अशी जयंती साजरी करत नाहीत तर त्या महापुरुषांच्या नावाला साजेशी अशी जयंती करणारेही बोटावर मोजण्या इतकेच आहेत..!! जात,पात आणि धर्म याचा विचार करणारी तरुण पिढी कसा काय देशाचा विकास करणार का केविलवाणा प्रश्न पडलाय..!!

*”निसर्गानं सर्वांना माणूस बनवून पाठवलं*
*माणसान मग माणसाला जातीत बांधलय,*
*जातीभेद करून जातीच राजकारण पेटवलय*
*माणसाची खरी जात माणुसकी आहे,*
*हे विधान मग त्यानं संपवलं”*
या सगळ्याच्या आहारी गेलेली आजची तरुण पिढी पहिली की वाईट वाटतं कारण अब्दुल कलाम यांनी २००६-२००७ या त्यांच्या राष्ट्रपतीच्या कारकीर्दीत असं स्वप्न पाहिलं होतं की २०२० साली याचं तरुणांच्या जीवावर भारत जगात महासत्ताक होईल हे त्यांचं स्वप्न पूर्ण झाल का…??
नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा”या नाऱ्याने पूर्ण भारत देश उत्साहाने पेटून उठला होता आणि आत्ताचे तरुण म्हणतात तुम मुझे सिगरेट दो मैं तुम्हे दारू दूंगा..!! नेताजींच्या तुम मुझे खून दो मैं तुम्हे अझादी दूंगा या वाक्याला कलंक लागताना पाहायला मिळतोय आणि तो लावतेय सध्याची घडत असलेली तरुण पिढी..!!!
असं बिलकुल नाही की सगळेच तरुण हे व्यसन,जातीभेद आणि थोर पुरुष्यांच्या विचारला काळीमा फासतायत १००% पैकी फक्त २५% तरुणाई तरी एक सुजाण तरुण आणि नागरिक म्हणून आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी आपला हातभार लावतेय…पण आत्ता वेळ आहे ती म्हणजे राहिलेले ७५% तरुणांना एक आदर्श तरुण म्हणून तयार करण्याची,आणि असं झालं तर खरच आपला भारत देश हा खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम देश होईल…!!!

*नवं तारुण्य…*
🖋️:-गौरी कांचन विज्ञान लोंढे.
(शंकरराव मोहिते महाविद्यालय,बी. ए भाग १ अकलूज)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button