थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तात्काळ अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयात आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक दिवसांपासून साखर कारखान्यांकडे ऊस बिल थकले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खत, बियाणे, मजुरी आणि इतर खर्च भागवणे कठीण झाले असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून थकीत रकमेबाबत तातडीने कारवाई करावी, संबंधित कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनामुळे काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले.

शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल लवकरात लवकर मिळावे, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.यावेळी सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष,विजय रणदिवे, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, मोहसीन पटेल,विकास काळे या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील थकीत ऊस बिले असलेल्या कारखान्यांनी चार दिवसात शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिले व्याजासह, शेतकऱ्यांना द्यावेत अन्यथा कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
अजित बोरकर
स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष



