अकलूजमध्ये गौरईंसमोर तुकोबांच्या अभंगांचा जागर

अकलूजमध्ये गौरईंसमोर तुकोबांच्या अभंगांचा जागर
देशमुख परिवाराचे प्रबोधनात्मक देखाव्याचे सहावे वर्ष
संचार वृत्त अपडेट
अकलूजच्या मोहनराव देशमुख कुटुंबाने यंदा गौरईंसमोर ‘तुका आकाशाएवढा’ हा देखावा साकारला आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा जरी इंद्रायणी नदीत बुडवली गेली असली तरी त्यांच्या अभंगातील विचार आजही तरंगत असल्याचा प्रबोधनात्मक देखावा त्यांनी उभा केला आहे. सामाजिक विषयांवर देखावा साकारण्याचे हे त्यांचे सहावे वर्ष आहे.
या देखाव्यात तुकोबा इंद्रायणीच्या डोहात गाथा सोडताना दिसत आहेत मात्र तीच नदी पुढे प्रवाहित होत असताना गाथेतील अभंग महापुरुषांच्या कृतीतून तरल्याचे पाहून गाथा जिवंत झाल्याचा प्रत्यय येत आहे.
‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ या तुकोबांच्या अभंगानुसार सावित्रीबाई फुलेंनी बहुसंख्य लोकांच्या विरोधात जाऊनही सत्य स्वीकारले आणि शैक्षणिक क्रांती केली हा प्रसंग नदीतून अभांगला नवसंजीवनी देतो. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’ या अभंगाचा सिंधुताई सपकाळ खऱ्या अर्थाने गाथेतील विचार जिवंत ठेवताना दिसतात. त्यांनी स्वतः वेदनांचा हलाहल पचवून अनाथांच्या जीवनात अमृताचा सिंधू उभा केला आणि मानवतेची प्रेरणा ठरल्या. पुढचा नदीत तरंगणारा अभंग आहे ‘असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. संतश्रेष्ठ तुकारामांनी अभ्यास म्हणजे सायास, प्रयास, प्रयत्न, सराव, मेहनत. जीवनात कोणत्याही प्रकारची परिस्थिती आली तरी तुम्ही दृढनिश्चय केलात तर तुमची स्वप्ने सत्यात उतरवू शकता असा संदेश देणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे अभांगला देखाव्यातून सार्थ ठरतात. अभंगाच्या वचनाशी समर्पक असे महापुरुषांचे कार्य दर्शविते की तुकोबाराय केवळ वारकरी संप्रदायाचे कळसच नाहीत तर जीवनाभिमुख तत्वज्ञानाची मांडणी करणारे विचार सूर्य आहेत.
तुकोबा आणि शिवबा हे या मातीचा प्राण आहेत. या दोहोंचा विचार म्हणजे महाराष्ट्र धर्म होय. या गुरू शिष्य भेटीचा घडलेला प्रसंग गौरईंसमोर पाहताना भक्ती शक्तीच्या संगमाची अनुभूती येते. तुका म्हणे मायबापे, अवघी देवाची स्वरूपे हा देखावा सांगत आहे की आई वडील म्हणजे ईश्वराचे स्वरूप होत. आई वडीलांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत तुकोबांनी दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखाव्यातील प्रमुख आकर्षण आहे.
________________________________
संत तुकाराम महाराज हे मानवी जीवनाचे एक श्रेष्ठ भाष्यकार होते. इंद्रायणीच्या डोहात बुडालेले वैभव लोकगंगेमध्ये मात्र यशस्वीपणे तरले आहे. चांगल्या विचारांच्या रुपात असलेला तुकोबा असंख्य लोकांच्या वाणीतून, कृतीतून आजही स्वतःचा प्रत्यय देत आहे, हीच देखावा साकारण्यामागची मूळ संकल्पना आहे.
मोहनराव देशमुख, अकलूज