solapur

रोटरी क्लब व भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने गरजूंना आरो वॉटर फिल्टर चे वाटप

रोटरी क्लब व भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने गरजूंना आरो वॉटर फिल्टर चे वाटप

शुद्ध पाण्याचा मुलांना लाभ, आरोग्य सुधारण्यास मदत – केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे

संचार वृत्त अपडेट 

अकलूज (प्रतिनिधी) : शैक्षणिक, वैद्यकीय, जल व्यवस्थापन, पर्यावरण आदी क्षेत्रात जागतिक पातळीवर कार्यरत असलेली रोटरी क्लब, अकलूज ही संस्था विविध स्तरावर समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब अकलूज आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थांच्या सौजन्यातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या वेळापूर केंद्र अंतर्गत डोंबारी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर या शाळेमध्ये २५ लिटर क्षमतेचा आरो (RO) वॉटर फिल्टर बसविण्यात आला. याप्रसंगी वेळापूर केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे यांनी प्रतिपादन करताना म्हणाले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार असून त्यांच्यातील पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास व्यक्त करत रोटरी क्लब अकलूज आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज या दोन्ही संस्थां राबवित असलेले उपक्रम आदर्शवत असून, यामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील आवश्यक गरजांची पूर्तता होण्यास मदत होईल असे नाईकनवरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब, अकलूजचे अध्यक्ष रो. केतन बोरावके, सचिव रो. अजिंक्य जाधव, संचालक रो. राजीव बनकर, भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजचे प्राचार्य व रोटरी सदस्य गजानन जवंजाळ, विद्यार्थी प्रतिनिधी काजल वळकुंडे, आर्यन नागरगोजे, प्रज्ञा गायकवाड, जिल्हा परिषद मुलींची शाळा वेळापूर चे मुख्याध्यापक इन्नूस तांबोळी सर, मदतनीस अर्चना वसेकर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आरओ वॉटर फिल्टर प्रदान करतानाच्या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. केतन बोरावके यांनी बोलताना सांगितले की, रोटरी क्लब अकलूज ने माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमधील मुलांसाठी डिजिटल क्लासरूम, ई लर्निंग सॉफ्टवेअर, टॅब, वॉश बेसिन, खेळांचे साहित्य, सायकल, ग्रंथालय इत्यादी सुविधा देत जिल्हा परिषद शाळेमधील मुलांची शैक्षणिक व शैक्षणिकेतर गुणवत्ता वाढवण्यासाठी भरीव काम करत आहे. “जिल्हा परिषद शाळां मधील मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले आरोग्य मिळावे, हा आमचा उद्देश आहे. हे आरो यंत्र बसविण्यामुळे त्यांना शुद्ध पाणी मिळेल आणि हे त्यांच्यासाठी एक आरोग्यदायी पाऊल ठरेल.” असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी गणेशोत्सवानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व गणेशोत्सवात हा वॉटर फिल्टर बसविला मुळे सर्व उपस्थितांनी “गणपती बाप्पा मोरया” चा जय घोष करण्यात येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले.

रोटरी क्लबचा आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चा हा उपक्रम सामाजिक भान जपत ग्रामीण भागातील शैक्षणिक आरोग्य सुधारण्यासाठी दिशा दाखवणारा ठरत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या शाळेतील उपशिक्षक वीरेंद्र पतकी सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक रूपचंद जाधवर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button