माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी (अजित) पक्षाला खिंडार

माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी (अजित) पक्षाला खिंडार
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथे मुळात कार्यकत्यांची पदाधिकाऱ्यांनी वानवा असताना त्यातील काही प्रमुख जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याने माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित) खिंडार पडले आहे.माळशिरस तालुक्यात प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून त्यांचा तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्राबल्य नाममात्र आहे. असे असताना महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपने जिल्ह्यात ऑपरेशन लोटस हाती घेतले आहे. त्यात अनेक मासे त्यांच्या गळाला लागले आहेत.त्यातच अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित) जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड, माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे, शहराध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष सुनील गायकवाड हे गळाला लागले. त्यांनी माजी आमदार राम सातपुते व अकलूज मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यकत्याँचा भाजपात प्रवेश करुन घेतला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले की, पक्षाने नगरपरिषद निवडणूक स्वतंत्र लढवण्याचे सांगून तशी तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार इच्छुक उमेदवारांची यादी करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठांकडून अकलूजचे आम्ही पाहतो, असे सांगण्यात आले.तर माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे यांनी आम्हाला पक्षच थांबवण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही थांबणारे नव्हतो आमची लढाई ही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आहे असे सांगितले.त्यामुळे इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तालुक्यातील काही मातब्बर राजकीय व्यक्ती वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय भांड आदी प्रमुख नेते उरले आहेत. सुरेश पालवे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून ते बारामती, पुणे व पिंपरी चिंचवडचे निरीक्षक म्हणून पक्षाचे काम पहात आहेत.



