solapur

गिरझणी ग्रामपंचायतला ‘कुलूप’ सरपंच ग्रामसेवकाचें टोलवा टोलवीची उत्तरे

गिरझणी ग्रामपंचायतला ‘कुलूप’ सरपंच ग्रामसेवकाचें टोलवा टोलवीची उत्तरे

लोकसेवेला टाळाच का? ग्रामस्थात संताप, विद्यार्थी पालक हवालदिल,तर प्रशासन सुस्त

संचार वृत्त अपडेट 

गिरझणी, ता. माळशिरस येथील ग्रामपंचायत कार्यालय गेल्या 20 दिवसांपासून कुलूपबंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने दाखल्यांसाठी येणाऱ्या विद्यार्थी व ग्रामस्थांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. याबाबत विचारणा केली असता, सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.सध्या दहावी-बारावीचे निकाल लागले असून, पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जन्म नोंद दाखला यासारख्या कागदपत्रांची नितांत आवश्यकता आहे. मात्र, गिरझणी ग्रामपंचायत कार्यालयाचे लोखंडी गेट 20 दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल होत आहेत. रोज कार्यालयात येऊनही दाखले मिळत नसल्याने प्रवेशाला उशीर होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायत कार्यालय बंद का आहे, ग्रामसेवक कुठे आहेत, याबाबत सरपंचांना विचारले असता “मला काय माहित, ग्रामसेवकांना विचारा” असे उडवाउडवीचे उत्तर मिळते. या ‘एकमेकांकडे बोट दाखवण्या’च्या प्रकारामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत.सूचना फलकावर फक्त कागद, आतमध्ये शुकशुकाट फोटोत दिसत असल्याप्रमाणे, कार्यालयाच्या बाहेरील सूचना फलकावर काही कागद चिकटवले आहेत, परंतु मुख्य लोखंडी गेटला कुलूप आहे. खिडक्याही बंद असून, आतमध्ये कोणतीही हालचाल दिसत नाही. पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल, दाखले अशा मूलभूत कामांसाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, 20 दिवसांपासून सर्वच कारभार ठप्प झाला आहे.
कार्यालय नाही उघडले तर ग्रामस्थ आणि विद्यार्थी पंचायत समिती कार्यालयास कुलूप लावण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे

प्रशासनाचे दुर्लक्ष

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा कणा असून, येथूनच ग्रामीण भागातील जनतेची कामे होणे अपेक्षित आहे. मात्र, गिरझणीत नेमके उलटे चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन, ग्रामपंचायत कार्यालय सुरळीत सुरू करावे व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button