maharashtra

साखरेच्या दराची ‘साठी’कडे वाटचाल!

साखरेच्या दराची ‘साठी’कडे वाटचाल!

 

कारखान्यांनी ‘दुसरा हप्ता’ द्यावा

माळशिरस तालुका ‘स्वाभिमानी’ ची मागणी

 

 

अकलूज (प्रतिनिधी)

 

साखरेचा भाव रोजच्या रोज वाढत चाललेला आहे. ३८ रूपयांपासूनची असलेली साखर आता ५४ रूपयांपर्यंत गेली आहे. लवकरच ६० रूपये गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना साखरेचा गोडवा कडू लागत आहे. त्यातच ज्या ऊस उत्पादकांनी ३०००/- रूपये दर घेवून आपला ऊस विकला तो शेतकरी मात्र आता मोठ्या विवंचनेत पडला आहे.

कारखान्याचा हंगाम सुरू झाला की साखरेचा दर पडतो आणि कांही महिन्यातच पुन्हा दर वाढतो. मग दर वाढतो तर आम्हा शेतकऱ्याला का दर वाढवून दिला जात नाही. दर ६० साठीकडे चालला आहे. तर किमान दसरा दिवाळीसाठी एखादा २०० किंवा ३०० चा ऊसाचा दुसरा हप्ता काढून आम्हाला दर वाढीचा फायदा द्या साखरेला मिळत असलेल्या या ऐतिहासिक तेजीचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी साखर कारखान्यांनी तातडीने एफआरपी व्यतिरिक्त ‘दुसरा हप्ता’ (फरक रक्कम) जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी आक्रमक मागणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.तर शेतकरी आशा करीत कारखान्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या घोषणेकडे डोळे लावून बसला आहे.

यावर्षी जूनमध्ये पावसाने पाठ फिरवली आँगस्ट महिना निम्मा संपत आला तरी दमदार पाऊस नाही. त्यामुळे अनेकांच्या डब्बल पीक घेण्याच्या आशा मावळल्या. पाऊस गायब झाला त्यामुळे ऊस पिकाला मोठी वाढ मिळाली नाही. पाऊस गायब झाल्याने अनेकांनी नवीन ऊस लागवडी साठी राने मोकळीची ठेवली आहेत. त्यामुळे सणासुदीकरीता थोडक्यात होणारी आर्थिक मदतच थांबली गेली. एकीकडे महागाईचे चटके आणि दुसरीकडे पावसाच्या गडबडीने शेतकरीच हबकला आहे.ऐन सणात आर्थिक गाडी रूळावर ठेवताना कसरतच करावी लागणार आहे.त्यामुळे आता शेतकऱ्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यातच साखरेचा भाव गगनाला भिडला आहे. ऊस तोडीच्या वेळेला असलेली ३८ रूपयांची साखर आता ५४ झाली आहे. उद्या ६० रूपये होईल असा अंदाज आहे. त्यामुळे साखर कारखाने या दरवाढीचा फायदा घेतील. मात्र याच फायद्यातील थोडी मदत शेतकऱ्याला मिळावी, अशी आशा शेतकरी वर्गाला लागली आहे. अजून अनेक कारखान्यांकडे साखरेचा मोठा साठा आहे. त्यामुळे यामधून कारखान्याला मोठा फायदा असला तरी त्यातील थोडी मदत आता शेतकरी वर्गाला महागाईच्या वेळेत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आता कारखान्यांनी किमान २०० ते ३०० रूपयांचे दुसरे बिल देवून मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ऊस पिकवण्यासाठी खते, बियाणे, मजुरी व वाहतुकीचा अफाट खर्च सोसणारा बळीराजा मात्र अद्याप रास्त आणि किफायतशीर दराच्या (FRP) मर्यादेतच अडकला आहे.साखरेच्या वाढलेल्या दरामुळे कारखान्यांचे उत्पन्न वाढले असून, या अतिरिक्त नफ्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

या मागणीमुळे माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची आशा लागून राहिली आहे.आता साखर कारखानदार काय निर्णय घेतात, याकडे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

• तात्काळ दुसरा हप्ता जाहीर करावा

एकीकडे साखरेचा दर वाढला असला तरी इथेनॉलचाही दर वाढला आहे. त्यामुळे कारखाने फायद्यात आहेत. साखर दर आणि इथेनॉल दर वाढीबरोबर इतर उत्पादनाचा फायदा पाहता शेतकऱ्यांना २०० ते ३०० रूपयांचा हप्ता देण्यास कोणत्याच कारखान्याला अडचण येणार नाही.साखरेचे दर जेव्हा घसरतात, तेव्हा कारखाने तोट्याचे कारण पुढे करतात. आता साखरेला चांगला दर मिळत असताना त्याचा फायदा शेतकऱ्यांना का दिला जात नाही? कारखानदारांनी तात्काळ दुसरा हप्ता जाहीर करावा अन्यथा कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यास तालुक्यातील साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.

 

अजित बोरकर, अध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button