solapur

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने २५ लाखांची लाच; माळशिरसमध्ये ‘एसीबी’चा छापा, दोघांना अटक

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने २५ लाखांची लाच; माळशिरसमध्ये ‘एसीबी’चा छापा, दोघांना अटक

संचार वृत्त अपडेट  (लक्ष्मीकांत कुरुंदकर)

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (डीवायएसपी) नावाने तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे मोठी कारवाई केली आहे.प्रकरणात लाचेची मागणी करणाऱ्या दोन खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली असून, दोन पोलीस हवालदारांसह एकूण चौघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी संशयितांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला होता. त्यासाठी तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकारानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.एसीबी’च्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, तक्रारदाराकडे २५ लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने माळशिरस परिसरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत लाच मागणाऱ्या आबा वळकुंदे आणि महादेव माने या दोन खासगी दलालांना ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली.या संपूर्ण प्रकरणात मध्यस्थी करणे आणि लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार अनिल महादेव शिंदे आणि माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ यांचाही सहभाग उघडकीस आला आहे. त्यानुसार या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लाचखोरीच्या रॅकेटमध्ये पोलीस दलातील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.ही धडक कारवाई ‘एसीबी’चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ यांच्यासह सतीश वाळके, मिथुन म्हात्रे, राजेश बाटे, प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनावणे आणि चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली. थेट पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने लाच मागितल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button