solapur

माणुसकीचं रक्षाबंधन; पोलिसांच्या मनगटावर राखी उजळले बंदीजनांचे चेहरे

माणुसकीचं रक्षाबंधन; पोलिसांच्या मनगटावर राखी उजळले बंदीजनांचे चेहरे

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण. मात्र सणासुदीलाही कुटुंबापासून दूर राहून समाजाच्या रक्षणासाठी तैनात असलेले पोलीस आणि आपल्या चुकांमुळे कुटुंबापासून दुरावलेले बंदीजन यांच्यासाठी यंदाचे रक्षाबंधन अविस्मरणीय ठरले. सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार शोभा वाघमोडे यांच्या संकल्पनेतून माळशिरस पोलीस ठाण्यात एक आगळावेगळा आणि भावनिक रक्षाबंधन सोहळा पार पडला.
यावेळी माळशिरस पोलीस ठाण्याचे डीवायएसपी विशाल नवले यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शोभा वाघमोडे यांनी राख्या बांधल्या. ‘तुम्ही अहोरात्र रक्षण करता म्हणूनच आम्ही सण-उत्सव सुरक्षितपणे साजरे करू शकतो,’ अशा शब्दांत त्यांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.या सोहळ्यातील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे पोलीस कोठडीतील बंदीजनांना राखी बांधण्याचा उपक्रम. कपाळावर कुंकुमतिलक लावून, आरती ओवाळून जेव्हा वाघमोडे यांनी बंदीजनांच्या मनगटावर राखी बांधली, तेव्हा अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हक्काच्या बहिणीची माया अनुभवल्यानंतर अनेक बंदीजन भावूक झाले.
“या राखीमुळे आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली असून, बाहेर पडल्यानंतर एक चांगला व जबाबदार नागरिक म्हणून जगू,” असा संकल्प यावेळी काही बंदीजनांनी व्यक्त केला.
दरम्यान, या उपक्रमाचे पोलीस प्रशासनाने मनापासून स्वागत केले. “सणाच्या दिवशीही पोलीस कर्तव्यावर असतात. अशा वेळी हा सोहळा मानवी संवेदना जपणारा आहे. यामुळे बंदीजनांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होण्यास मदत होईल,” असे मत यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.वाघमोडे यांचा हा संवेदनशील उपक्रम सध्या संपूर्ण माळशिरस तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button