संग्रामनगर येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिरात श्री गुरूपौर्णिमा सप्ताहाचे आयोजन
केदार लोहकरे
संग्रामनगर दि.१८ (प्रतिनिधी)संग्रामनगर (ता.माळशिरस) येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह १५ जुलै ते २१ जुलै अखेर संपन्न होणार आहे.या गुरूपौर्णिमा सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
यामध्ये पहाटे ५ ते ६ श्रीं ची काकड आरती त्यानंतर सकाळी ६ ते ७:३० श्रीं ना दुग्धाभिषेक व सकाळी ८ ते १० या वेळेमध्ये श्री सद्गुरू लिलामृत या सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र ग्रंथाचे सामुदायिक पारायण होणार आहे.या पारायण सेवेमध्ये ७० साधक सहभागी झाले आहेत.या सप्ताहामध्ये आषाढी एकादशी निमित्त श्रीमद् भागवत ग्रंथाचे वाचन करण्यात आले.यामध्ये ४० साधकांनी सेवा केली.या सप्ताहामध्ये सकाळी १० ते ११:३० या वेळेत श्री ब्रह्मचैतन्य संस्कृत स्तोत्र पाठ महिला मंडळाने श्री विष्णू सहस्त्रनाम नाम,श्रीसुक्त,श्री पांडुरंग अष्टक, श्रीराम रक्षा, श्री मारूती स्तोत्र इत्यादी पाठ सेवा सुरू आहे. दुपारी १२ च्या आरती नंतर सुश्राव्य भजन सेवा होत आहे.यामध्ये विविध भजनी मंडळाकडून सेवा होत आहे.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सत्संग मंडळाने श्रीराम जय राम जय जय जय या त्रयोदशासरी राम मंत्राचे अखंड २५ तास जपाचे नियोजन केलेले असून या सप्ताहामध्ये पारायणास बसलेल्या साधकांना व भक्त मंडळीना सत्संग मंडळाच्या वतीने दररोज प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.
- श्री गुरूपौर्णिमा दिवशी पहाटे ५ ते ६ वा श्रीं ची काकड आरती,सकाळी ५:५५ ते दुस-या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत अखंड २५ तास श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राची जपसेवा संपन्न होणार आहे.सकाळी ६ ते ७:३० यावेळेत श्रीं ना दुग्धाभिषेक होणार आहे. दिवसभर नित्याचे कार्यक्रम होणार आहेत.यामध्ये दुपारी ३ ते ५ श्रीराम कृपा भजनी मंडळाची सेवा होईल.व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प.श्री मोहनानंद महाराज,संत आखाडा प्रमुख उत्तर प्रदेश यांचे श्री महाराजांचे उपदेशावर प्रवचन होणार आहे व सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत महाप्रसादाची सेवा होईल.
- तरी सर्व भक्तांनी सद्गुरू सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिराच्या विश्वस्त मंडळानी केली आहे.