रत्नाई राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन
अकलूज येथे रत्नाई चषक राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन
संचारवृत्त- अकलूज (प्रतिनिधी)
येथील प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने व मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मा. श्री.मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त रविवार, २८ जुलै रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज येथे देशातील ग्रामीण भागातील स्पर्धक संख्येनुसार सर्वात मोठी स्पर्धा भरविण्याच्या उद्देशाने रत्नाई चषक राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते- पाटील यांनी दिली.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही स्पर्धा १० वर्षे वयोगट, १६ वर्षे वयोगट व खुला गट अशा तीन गटांसाठी आयोजित केली आहे. वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी परितोषिके व मेडल्स ठेवलेली आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट पुरुष व महिला पालक, सर्वात लहान खेळाडू, सर्वात ज्येष्ठ खेळाडू आणि सर्वाधिक सहभाग शाळा, क्लास सहभाग ट्रॉफीज व ६० कॅश प्राईज, १०१ ट्रॉफीज, १०१ मेडल तसेच प्रत्येक गटात ६० पेक्षा अधिक बक्षिसे ठेवलेली आहेत. खेळात पालकांचा सहभाग वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ३ महिला व पुरुष पालकांना स्वतंत्र बक्षीसे ठेवली आहेत. उपस्थित सर्व स्पर्धेकांना अल्पोपहार देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ७०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावर्षी १हजार पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होतील असे नियोजन केले आहे. याशिवाय माळशिरस तालुक्यातील खेळाडूंनाही संधी मिळावी याकरिता तीन ही गटांमध्ये तालुक्यातील खेळाडूसाठी स्वतंत्र वेगवेगळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा स्विझलिग पद्धतीने खेळवली जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये १०० ठेवण्यात आली असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी सांगितले. स्पर्धा नोंदणी २५ जुलै रोजी सायं. ७ वाजेपर्यंतच ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जाणार आहे. १० वर्षे वयोगटाकरिता राजन चिंचकर ८९८३०३७०५५, १६ वर्षे वयोगटाकरिता जयप्रकाश जगताप ९०९६०५२१९७ व खुल्या गटासाठी रावसाहेब मगर ९१४५७८४५८७ या क्रमांकावर संपर्क करून सहभाग नोंदविण्याचे आवाहन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव, व स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे यांनी केले आहे.