गौराई समोर स्त्री सन्मानाचा शिवकाळ
गौरईंसमोर स्त्री सन्मानाचा शिवकाळ
अकलूजच्या देशमुख कुटुंबाने साकारला शिवरायांच्या स्त्री धोरणाचा देखावा.
परस्त्री माते समान, केला नेहमीच महिलांचा सन्मान…! नाही होऊ दिला स्त्रियांवर अन्याय, आठवावे शिवराय…!
आजूबाजूला घडणाऱ्या महिला विरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहिल्या की, शिवरायांच्या विचारांची कधी नव्हे ते एवढी गरज असल्याचे जाणवते. म्हणूनच अकलूजच्या देशमुख कुटुंबाने यंदाच्या वर्षी स्त्री सन्मानाचा शिवकाळ हा देखावा गौरईंसमोर साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री धोरणाला उजाळा देताना स्त्रियांना देण्यात येणारी सन्मानाची व न्यायाची वागणूक विविध प्रसंगातून साकारली आहे.
शिवशाहीत स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल कठोर शिक्षा देण्यात येत असे. ‘स्त्रीशी बदअंमल करणाऱ्यास दोन्ही हातपाय कलम करून चौरंगा करावा’ या शिवरायांच्या कठोर शिक्षेचा प्रसंग गौरईंसमोर साकारला आहे. आजच्या घडीला देखील राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीच या प्रसंगातून केल्याचे दिसून येत आहे. शत्रू पक्षाच्या सुभेदाराच्या सुनेला पाहताच ‘अशीच आमुची आई असती सुंदर, रूपवती, आम्हीं ही सुंदर झालो असतो वदलें छत्रपती’ हा साकारलेला प्रसंग शिवरायांच्या उच्चकोटीच्या नीतिमत्तेचे दर्शन करून देतो. बाळाच्या ओढीने अवघड बुरुज उतरत असलेली हिरकणी लक्ष वेधून घेते. शेजारीच सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्या सारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही असे उद्गारलेले शिवराय दिसतात. जिजाऊ बालशिवबाला बाळकडू देतानाचा प्रसंग जाणीव करून देतो की घरच्या संस्कारामुळेच स्त्री जातीचा आदर त्यांच्या रक्तात भिनला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात कठोर शिक्षेचा धाक होता. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली नाही. त्यामुळे महिलांकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहत नसायचे. आदर्श शासनव्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. महिलांचा सन्मान केला. स्वराज्यातील स्त्रियांच्या ते पाठीशी राहिलेच. पण शत्रूंच्या स्त्रियांचाही त्यांनी योग्य तो आदर ठेवला, त्यांना सन्मानाने वागवले. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील.
—————————————
फक्तं नावापुरते शिवराय नकोत, विचारांचा थोडातरी संग असावा.. दहन व्हावे राक्षसी मानसिकतेचे, भर चौका चौकात चौरंग व्हावा…!
अनुजा देशमुख