माळशिरस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग मांडवे,पिलीव,फोडशिंरस होणार हाय व्होल्टेज लढती

माळशिरस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग
मांडवे,पिलीव,फोडशिंरस होणार हाय व्होल्टेज लढती
संचार वृत्त अपडेट
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर करताच माळशिरस तालुक्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. तालुक्यातील मांडवे, पिलीव,फोडशिंरस जिल्हा परिषद गटांत हाय व्होल्टेज लढती होणार आहेत. माळशिरस तालुक्यात या गावांचा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे.५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. या घोषणेमुळे संभाव्य उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मांडवे गट तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा आणि हॉट सीट ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या मांडवे गटात विविध पक्षांतील इच्छुकांची संख्या मोठी असून बैठका, स्नेहभोजन, देवदर्शन आणि संपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जात आहे.अनेक इच्छुकांनी मीच उमेदवार अशा आविर्भावात कामाला सुरुवात केल्याने पक्षांतर्गत स्पर्धाही तीव्र झाली आहे. या निवडणुकीत विकासकामे, रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण हे कळीचे मुद्दे ठरणार आहेत. अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी गुप्त बैठका आणि कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी केली जात आहे. मागील निवडणुकीतील चुरस लक्षात घेता यंदाची लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवडणुकीच्या तारखांच्या अधिकृत घोषणेमुळे आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रशासनानेही निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने संपूर्ण तालुक्यात आचारसंहितेचा अंमल आणि निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान,मांडवे जिल्हा परिषद गटांत प्रस्थापितां कडून उमेदवार कोण असणार?तर भाजप कडून कोण निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार याकडे लक्ष वेधले आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या उंबरठ्यावर चकरा सुरू…..
निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची मर्जी संपादन करणे आणि तिकिटासाठी वरिष्ठ नेत्यांच्या उंबरठ्यावर चकरा मारणे आता अधिकृतपणे सुरू होणार आहे.



