मायबोली मराठीने महाराष्ट्रातील मराठमोळ्या मातीशी जोडलेली नाळ म्हणजे शाहीर दादा कोंडके : सुहास उरवणे

मायबोली मराठीने महाराष्ट्रातील मराठमोळ्या मातीशी जोडलेली नाळ म्हणजे शाहीर दादा कोंडके : सुहास उरवणे
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूज येथे शाहीर दादा कोंडके यांचा २७ वा स्मृतीदिन अकलूज येथे डॉ.फारुख शेख यांच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या स्मृतिदिनानिमित्त दादा कोंडके यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन साहित्यिक, निवेदक सुहास उरवणे,प्रा.नितीन सुर्यवंशी,डीसीसी बँक माळशिरसचे व्यवस्थापक उमाजी भोसले,पोलीस कॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, माळशिरस न्यायालय येथील दीपक गेडाम,स्माईल 90.8 एफएम अकलूजचे संचालक शंकर बागडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्याख्याते सुहास उरवणे यांनी दादा कोंडके यांचा जीवनपट उलगडताना म्हणाले की,आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला.यामध्ये दादा कोंडके यांचे मोलाचे योगदान आहे.दादांचे चित्रपट,चित्रपटातील गाणी हे निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या जीवनाला स्पर्श करणारी अशीच आहेत.मराठी मातीतून जन्म घेऊन आभाळापर्यंत पोहोचलेला
आणि मायबोली मराठीने महाराष्ट्रातील मराठमोळ्या मातीशी जोडलेली नाळ म्हणजे शाहीर दादा कोंडके.शिवसेनेच्या व्यासपीठावरून शिवसेनेचा पाईक म्हणून काम पाहताना आणि चित्रपटातून व्यक्त होताना हिंदू-मुस्लिम बॅलन्स सांभाळण्याचं काम दादा कोंडके यांनी केले.दादांनी त्यांच्या चित्रपटांच्या नावांमधूनच द्विअर्थ विशद करताना चित्रपट पाहिल्यानंतर मात्र जाणवते की, गरीब कुटुंबामधून जन्माला आलेला,अर्ध्या चड्डीतला, खेड्यामध्ये राहिलेल्या या माणसाने चित्रपटाच्या माध्यमातून राजकारणावर,
समाजकारणावर,अर्थकारण आदी बाबींवर प्रश्न उभे करून मनोरंजनातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले.नर्म विनोदी शब्दातून हळूच चिमटे काढत समाज प्रबोधनाचे स्वप्न पाहणारे लेखक,निर्माता,दिग्दर्शक,गीतकार म्हणजे “दादा कोंडके”. अशा शब्दांतून सुहास उरवणे यांनी दादा कोंडके यांचे जीवन चरित्र उलगडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथील मराठी विषयाचे प्रा.नितीन सूर्यवंशी म्हणाले की, दादा कोंडके यांचा २७ वा स्मृतिदिन आज अकलूजमध्ये दादा कोंडके यांच्या वतीने साजरा करताना समोरील रसिक श्रोते पाहिल्यानंतर लक्षात येते की,ते रसिक तर आहेतच त्याचबरोबर उपस्थित सर्वांच्यातील कलावंत चिरतरुणआहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,दादा कोंडके यांनी चित्रपटातून सांगून गेली ज्ञानेश्वरी…माणसा परास मेंढरं बरी…अशा शब्द रचनांमधून माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम केले.याप्रसंगी भारत गोरवे, रियाज चौधरी,समाधान देशमुख, डॉ.पांडुरंग नलवडे,शंकर बागडे, शांतीलाल कारंडे,कांतीलाल एकतपुरे यांनी मनोगत,गाणी, लावणी गीत,कविता सादर करत
दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमास रंगत आणली.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक दादा कोंडके फॅन क्लबचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल एकतपुरे यांनी करत दादा कोंडके यांचा स्मृतिदिन साजरा करण्याचे हे पाचवे वर्ष असून ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या माध्यमातून करत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जवंजाळ यांनी केले तर आभार वैभव आंबेकर यांनी मानले.याप्रसंगी अशोक घोडके,विकास जाधव, महादेव राजगुरू,किशोर घोडके, शिवाजी ननवरे,विजयसिंह पाटील,सचिन पाटील,वैभव आंबेकर,महेश बाबर,अमोल जवंजाळ,सचिन एकतपुरे, धनंजय यादव,विशाल घाडगे, राजू सावंत आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादा कोंडके फॅन क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.