solapur

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या शुभहस्ते खंडकरी शेतकऱ्यांना जमिनींचे वाटप

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या शुभहस्ते खंडकरी शेतकऱ्यांना जमिनींचे वाटप

अँड.सोमनाथ वाघमोडे ,भानुदास सालगुडे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

संचार वृत्त अपडेट 

 महाराष्ट्रात शेती महामंडळाच्या २७ हजार एकर जमिनींचे वाटप झाले असून माळशिरस तालुक्यात ६ हजार एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनींचे वाटप प्रलंबित होते, कारण तशी तरतूद नव्हती. परंतु खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करून ज्यांचे एक एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे अशा खंडकरी शेतकऱ्यांनाही शेती महामंडळाची जमीन मिळवून दिली आहे. यासाठी प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनीही सदरच्या फाईलींचा अत्यंत जलद गतीने निपटारा केल्यामुळे या लढ्याला लवकरच यश मिळाले असून १७ खंडकरी शेतकऱ्यांना दिवाळीच्या चार दिवस अगोदर प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनी जमीन वाटपाचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील शेती महामंडळाच्या जमिनीचे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करण्याचा लढा १९८२ सालापासून सुरू आहे. हा लढा ४० वर्षांहून अधिक काळ लढला गेल्याने या लढ्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, नाशिकचे माधवराव गायकवाड व दहिगांवचे बी. डी. पाटील आदि नेत्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तर त्यांच्या गाठीभेटी घेऊन सातत्याने ॲड. सोमनाथ वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यामुळे व प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांच्या जलद कामकाजामुळे दिवाळीपूर्वीच १७ खंडकऱ्यांना जमिनीचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली आहे. यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे पाटील, सदाशिवनगर मळ्याचे स्थावर व्यवस्थापक नाथाजी पाटील, तानाजी भोळे-भोसले आदी उपस्थित होते. यावेळी या जमीन वाटप कार्यक्रमास मनोरमा शांतीलाल गांधी, श्रीकृष्ण विष्णू कुलकर्णी, जगन्नाथ मुकुंदराव निंबाळकर, जयंत बारीकराव चव्हाण, हनुमंत निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, बाळू भगवान चव्हाण, रामचंद्र ज्ञानू चौगुले, कृष्णा तुकाराम शिंदे, बाळासाहेब माधवराव पाटील, शशीकांत सालगुडे पाटील, नारायण सालगुडे पाटील, अशोक तुकाराम शिंदे, दुर्योधन आडके यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रांत अधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या की, आपणांस मिळालेल्या जमिनी कुणीही विकू नयेत. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रशिक्षण राबवून आपण या जमिनीमध्ये व्यवसाय उभारावा. तरच आपण प्रगतीपथावर जाऊ, नाहीतर आपल्या भावी पिढीवर इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येऊ शकते. यावेळी ॲड. सोमनाथ  वाघमोडे, भानुदास सालगुडे पाटील व अशोक तुकाराम शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप केल्याबद्दल प्रांत अधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार सुरेश शेजुळ यांचा सत्कार खंडकरी शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. सोमनाथ वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button