तालुक्यातील प्रत्येक उमेदवार हे रामभाऊ सातपुते ठरवतील ; पालक मंत्री जयकुमार गोरे

तालुक्यातील प्रत्येक उमेदवार हे रामभाऊ सातपुते ठरवतील ; पालक मंत्री जयकुमार गोरे
संचार वृत्त अपडेट
अकलूज आता परिवर्तनाच्या वाटेवर आहे. यापूर्वी स्टेजवर फक्त एकाच घरातील लोक बसलेले दिसत, आता सामान्य माणूस स्टेजवर बसू लागले आहेत. मला एका वर्षाचा हिशोब विचारता, यांनी पन्नास वर्षात काय केले. तालुक्यातील २२ गावांना फक्त भाजपच पाणी आणू शकणार आहे. तालुक्यातील प्रत्येक उमेदवार हे रामभाऊ सातपुते ठरवतील. अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

नातेपुते येथे माळशिरस तालुक्यातील भाजपच्या कार्यकत्यांचा स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी माजी आमदार राम सातपुते यांच्यासह तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला.पालकमंत्री म्हणाले, माळशिरस तालुक्यातील प्रत्येक उमेदवार हे रामभाऊ सातपुते ठरवतील. बंद पडलेल्या साखर कारखान्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी दिला म्हणून तो सुरू होऊ शकला आहे. तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही. ते काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, पालकमंत्री तुमच्या पाठीशी ठामपणे आहेत अशी ग्वाही दिली.
माजी आमदार रामभाऊ सातपुते म्हणाले, एक लाख ८ हजार मते ही कार्यकर्त्यांच्या जिवावर मिळाली आहेत. ५ हजार मतात गुंडाळू म्हणणारे आता शुगर, बीपीच्या गोळ्या खात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत रणजितसिंहाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत असे ते म्हणाले, हा ढोंगीपणा तालुक्यातील जनतेने ओळखला आहे. लोकसभेत यांनी देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत आपणा सर्वजणांनी भाजपचेच काम करायचे आहे. पालकमंत्र्यांविषयी अर्वाच्य भाषेत काहीजण बोलतात त्यांची सिंधुदुर्गला बदली होणार, आता आम्ही पालकमंत्री होणार! अशा वावड्या उठवल्या जात आहेत. प्रस्थापितांना न्याय देणारा पालकमंत्री आपणास भेटला आहे. अकलूज नगरपरिषदेत भाजपचा अध्यक्ष होणार आहे. कार्यकत्यर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
माजी आमदार दिलीप माने यांचा प्रवेश होईल, मुख्यमंत्री स्थानिक नेतृत्वाची चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. राजन पाटील, बबनराव शिंदे, रणजितसिंह शिंदे, यशवंत माने यांचा प्रवेश लवकरच होईल. सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचे प्रवेश होणार आहेत. ऑपरेशन लोटस सुरूच राहणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.



