solapur

नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीचा आवाज घुमणार का ?

नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीचा आवाज घुमणार का ?

घडाळ्याच्या काट्यांची साथ तुतारीला लाभणार का ?

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस (तालुका प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जोरदार तयारी केली जात असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जिल्हा निवडणूक समिती जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळीचा या निवड समितीत समावेश असून या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर आघाडी  करून लढण्यास हरकत नाही असे सांगितले आहे त्यामुळे घडाळ्याच्या काट्यांची साथ तुतारीला लाभणार का ? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे  माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनीही मोहिते पाटलांशी चर्चा केली आहे सांगत आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडूनच अकलूज नगरपरिषद लढवणार आहे असे जाहीर केले आहे. गतवर्षीच्या माढा लोकसभा व माळशिरस विधान सभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) गटाच्या तुतारीचा आवाज माळशिरस तालुक्यात सर्वत्र खूपच घुमला होता.आता तोच आवाज अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत दिसणार का ? याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना लागली आहे.तर दुसरी सर्व शक्तीनिशी भारतीय जनता पक्ष अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरणार आहे.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार यात शंकाच नाही.त्यामुळे अकलूजच्या जनतेला अकलूज नगरपरिषदेची पहिलीच चुरशीची निवडणुक लढत बघायला मिळणार आहे.ऐन लोकसभेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी हातातील कमळ बाजूला ठेवून शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली होती.त्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे तीव्र आंदोलन सुरू होते व संपुर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षावरील  जनतेतील नाराजीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला झाला.त्यामुळे लोकसभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडून आले.पण पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत ही किमया महाराष्ट्रात फार दिसली नाही.त्यामुळे माळशिरस तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्यात चुरशीची लढत होवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला निसटता विजय मिळाला होता. त्यामुळे माळशिरस तालुका विधानसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारी आवाज घुमला पण बाकी ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला.विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील सत्ताधारी व त्यांचे कट्टर विरोधक एकत्र येवून विधानसभा निवडणूक लढवली होती तरी ही निसटत्या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला समाधान मानावे लागले होते.त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सिंह आला पण गड गेला अशी अवस्था झाली आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षात मोठ मोठे दिग्गज नेते दररोज पक्षात प्रवेश करू लागले आहेत.त्यात अकलूजमध्ये गल्लीबोळात भारतीय जनता पक्षाचे डिजीटल नामफलक दिसू लागले आहेत.त्यामुळे नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक इतिहास घडवून जाणार का ? त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. त्याबरोबर    महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे सेनेचे नेते किरण साठे यांनी अकलूज नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढवणार असून त्यांनी प्रत्येक वाॅर्डातील उमेदवार ही जाहीर केले आहेत.त्यामुळे ही निवडणूक साधी आणि सोपी राहिलेली नाही.इतर पक्षातील अजून उमेदवार निश्चित न झाल्यामुळे कोणत्या वार्डात कोण उमेदवार असणार हे आता तरी कोणी सांगू शकत नाही.पण ही नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार व इतिहास घडवून जाणार आहे यात काही शंकाच नाही.त्यात काही पक्षातील नेत्याच्या चाटाळ व निष्कीय कार्यकर्त्यामुळे पक्षाला दगाफटका  बसण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button