ज्याच्यासाठी संघर्ष करायचा,त्याचीच मिळेना शेतकरी संघटनांना ताकद

ज्याच्यासाठी संघर्ष करायचा,त्याचीच मिळेना शेतकरी संघटनांना ताकद
संचार वृत्त अपडेट
शेजारील तालुक्याच्या तुलनेत माळशिरस तालुक्यात साखर कारखान्याकडून उसाला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकऱ्यात असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून आंदोलने करण्यात येत असली तरी खुद्द शेतकऱ्याकडून त्याला अपेक्षित पाठबळ मिळत नसल्यामुळे संघर्षाची तीव्रता मर्यादित राहिली आहे. ज्याच्यासाठी लढा देत आहेत तेच शेतकरी संघटनेसोबत रस्त्यावर उतरत नाहीत. अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी व्यक्त केली.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस व दुधाला चांगला दर मिळावा म्हणून उग्र आंदोलन छेडले होते त्यांच्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की कोल्हापुरातील साखर कारखान्यांना शेतकरी संघटनांची ताकद कळून आली. परिणामी त्या जिल्ह्यामध्ये कारखानदारांना दर ठरवताना संघटनेच्या मागण्यांचा विचार करणे भाग पडले. मात्र माळशिरस तालुक्यात परिस्थिती वेगळीच आहे संघटना सक्रिय आहे मात्र शेतकऱ्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.आमचे मनोबल वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी साथ देणे गरजेचे आहे असे बोरकर यांनी सांगितले.
संघटनांच्या आंदोलना दरम्यान अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. पोलिसाकडून धरपकड झाली उसाला तोड येण्यासाठी व्यवस्थापनाकडे अनेक हेलपाटे घालावे लागतात.तरीही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा थांबणार नाही.परंतु शेतकऱ्यांनाही ऊस दरासाठीच्या संघर्षाला साथ देणे हीच काळाची गरज आहे.
मगन काळे (ज्येष्ठ नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना)
माळशिरस तालुक्यातील कारखान्यांनी पहिली उचल कमी काढल्याने शेजारील साताऱ्या जिल्ह्यातील श्रीराम फलटण,श्रीदत्त साखरवाडी यांनी 3300/- दर जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादकात चर्चेला उदान आले आहे.या जाहीर केलेल्या दरामुळे माळशिरस तालुक्यातील कारखान्यांना फटका बसू शकतो एक रकमी ३300/रु. मिळत असल्याने अनेकांचा कल या कारखान्याकडे ऊस पाठवण्याकडे वळला आहे.अजित बोरकर सारख्या नेतृत्वाची माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना गरज असून त्यांना मनापासून साथ देणेची गरज आहे
संजय वाघमोडे (तरंगफळ)



