वर्षानुवर्षे सरकारी जागेवर संसार आता हक्काच्या घराची आस

वर्षानुवर्षे सरकारी जागेवर संसार आता हक्काच्या घराची आस
घरकुल साठी जागेच्या मालकी हक्काची महसूलमंत्राकडे मागणी
संचार वृत्त अपडेट
अकलूज शहरातील १०७० झोपडपट्टी भागात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ६५ पात्र लाभार्थी कुटुंबांच्या ताब्यातील सरकारी जागा प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषानुसार नियमाकुल करून, त्यांना जागेचा मालकी हक्क देऊन घरकुल योजना लागू करावी, अशी आग्रही मागणी अकलूज नगर परिषदेच्या नगरसेविका दीपाली वाघमोडे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणी लवकरच सकारात्मक विचार करून दखल घेऊ असे आश्वासन दिले.यावेळी अमोल माने, संतोष टकले, संतोष वाघमोडे, शशीकांत रणवरे,महाविर खंडागळे, लक्ष्मण सदाफुले आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
१०७० झोपडपट्टी परिसरात गेली अनेक वर्षे ६५ कुटुंबे सरकारी जागेवर कच्चे बांधकाम करून पत्रा शेड मारून राहत आहेत. ही सर्व कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांच्या ताब्यातील जागा सरकारी असल्याने व मालकी हक्क नसल्याने त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ही जागा नियमाकुल करून, प्रत्येक कुटुंबाला मालकी हक्काचे पट्टे द्यावेत व PMAY अंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी अनुदान मंजूर करावे, असे निवेदनात म्हटले आहे.”गरीब कुटुंबे पिढ्यानपिढ्या येथे राहतात. पावसाळ्यात घरांची दुरवस्था होते. केंद्र व राज्य सरकारची PMAY योजना असूनही केवळ जागेच्या मालकी हक्काअभावी ही कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत,” असे वाघमोडे यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. “शासनाच्या ध्येयानुसार ‘सर्वांसाठी घरे’ हे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर १०७० मधील या ६५ कुटुंबांना न्याय द्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली.
बावनकुळे यांनी वाघमोडे यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन, नियमानुसार लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल. कोणताही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.महसूलमंत्र्यांच्या आश्वासनामुळे १०७० झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून, लवकरच हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा झोपडपट्टी वासिया कडून व्यक्त होत आहे



