solapur

सासवड माळी सोसायटीवर स्वाभिमानीचा झेंडा! ११ पैकी तब्बल १० जागांवर दणदणीत विजय; जयशंकर पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान

सासवड माळी सोसायटीवर स्वाभिमानीचा झेंडा!

११ पैकी तब्बल १० जागांवर दणदणीत विजय; जयशंकर पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या सन २०२६-२७ ते २०२८-२९ या कालावधीसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पॅनलने ११ पैकी तब्बल १० जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत जयशंकर पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. स्वाभिमानी पॅनलच्या या एकतर्फी विजयामुळे संस्थेच्या कारभारात नव्या नेतृत्वाची चाहूल लागली असून, सभासदांमध्ये ‘नवपर्वा’ची चर्चा रंगली आहे.
संस्थेच्या संचालक मंडळातील एकूण ११ जागांसाठी स्वाभिमानी पॅनल आणि जयशंकर पॅनल यांच्यात थेट लढत झाली. रविवारी (ता. ४) दि. मॉडेल विविधांगी प्रशालेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १,०२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी पुरुषांची ५१ तर महिलांची १५ मते बाद ठरली.
मतदानानंतर सायंकाळी साडेसहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री साडेदहापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. निकाल जाहीर होताच स्वाभिमानी पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. तब्बल दहा जागांवर मिळालेल्या विजयामुळे संस्थेच्या संचालक मंडळावर स्वाभिमानी पॅनलचे स्पष्ट बहुमत निर्माण झाले आहे.
स्वाभिमानी पॅनलचे विजयी उमेदवार
स्वाभिमानी पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये रत्नदीप बोरावके (५४३), डॉ. अविनाश जाधव (५७५), कल्पेश पांढरे (५६७), अजय गिरमे (४९७), केतन बोरावके (५७०), प्रीतम राऊत (५११), विक्रांत कुदळे (५५७), रोहित गिरमे (५१४), मंजुषा झगडे (५७६) आणि स्नेहा गिरमे (५६८) यांचा समावेश आहे.तर जयशंकर पॅनलचे आकाश राऊत यांनी ४७० मते मिळवत एकमेव जागेवर विजय मिळवला.विजयी उमेदवारांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारीअँड. रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली. निकालानंतर संस्थेचे चेअरमन मोहन लांडे यांच्या हस्ते स्वाभिमानी पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समर्थकांनी विजयाचा जल्लोष करत नव्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले.स्वाभिमानी पॅनलला मिळालेला ११ पैकी १० जागांचा कौल हा केवळ निवडणुकीतील विजय नसून, संस्थेतील बदलत्या समीकरणांचा स्पष्ट संकेत मानला जात आहे. सभासदांनी मोठ्या संख्येने स्वाभिमानी पॅनलच्या बाजूने कौल दिल्याने आगामी काळात संस्थेचा कारभार कोणत्या दिशेने जातो, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.शैक्षणिक क्षेत्राचा विस्तार, संस्थेच्या विकासाला गती, पारदर्शक कारभार आणि सभासदांच्या अपेक्षांची पूर्तता यासह विविध मुद्द्यांवर नव्या संचालक मंडळाकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यामुळे स्वाभिमानी पॅनलसमोर मिळालेला मोठा विजय टिकवून संस्थेच्या विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचे आव्हानही असणार आहे.स्वाभिमानी पॅनलच्या विजयानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सभासदांनी दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात एकजुटीने काम करू असा विश्वास विजयी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.११ पैकी १० जागांवर मिळालेला दणदणीत विजय आणि स्पष्ट बहुमतामुळे सासवड माळी एज्युकेशन सोसायटीत स्वाभिमानी पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, संस्थेच्या कारभारात आता खऱ्या अर्थाने ‘नवपर्वा’ची सुरुवात झाली असल्याची चर्चा सभासदांमध्ये रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button