solapur

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाठला जंतर-मंतर!

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाठला जंतर-मंतर!

दिल्लीच्या वेशीवर अडवले, शेकडो शेतकरी स्थानबद्ध; अखेर मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

 ऊसाला रास्त व किफायतशीर दर, साखरेला योग्य बाजारभाव आणि इथेनॉलच्या दरात वाढ यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्ली गाजवली. दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त झुगारून शेतकऱ्यांनी अखेर जंतर-मंतर गाठत आपल्या मागण्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला.
सोलापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून २ ऑक्टोबर रोजी निघालेले शेतकरी ५ ऑक्टोबरच्या पहाटे दिल्लीच्या वेशीवर दाखल झाले. मात्र, पोलिसांनी नोएडा बॉर्डर परिसरात सुमारे १ हजार ते १२०० शेतकऱ्यांना रोखले, तर २०० ते ३०० शेतकऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

दरम्यान, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील सचिन पाटील व अजित बोरकर यांनी निवडक सहकाऱ्यांसह पोलिसांचा अडथळा पार करून जंतर-मंतर गाठले आणि तेथे आंदोलनाची धुरा सांभाळली. पहाटे ३ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत शेतकरी व पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण कायम होते.
जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर स्थानबद्ध शेतकऱ्यांची सुटका करावी आणि मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडे द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. चर्चेनंतर पोलिसांनी स्थानबद्ध शेतकऱ्यांना सोडण्याचे तसेच निवेदन संबंधित केंद्र सरकारी खात्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये किलो, इथेनॉलचा दर ७५ रुपये प्रतिलिटर, घरगुती साखरेचा दर ५० रुपये किलो व औद्योगिक वापरासाठी १०० रुपये किलो करावा, तसेच साखरेचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून समावेश वगळावा, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
“दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा” या निर्धाराचा प्रत्यय देत पोलिसांचे अडथळे पार करून जंतर-मंतर गाठणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे लक्ष आपल्या प्रश्नांकडे वेधले आहे. आता या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button