मुंबईत सुविधा सोडा पाणी सुद्धा मिळणे कठीण ; अण्णासाहेब शिंदे

मुंबईत सुविधा सोडा पाणी सुद्धा मिळणे कठीण ; अण्णासाहेब शिंदे
संचारवृत्त अपडेट
लाखो परप्रांतियांना पोसणाऱ्या महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मूळ मराठ्यांना सुविधा सोडाच पाणीही मिळणे कठीण झाले आहे. शासन कितीही सुविधा दिल्याचे सांगत असले तरी आंदोलनकर्त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने मुंबईत आपण परके झाल्याची भावना माळशिरस तालुक्यातून गेलेल्या अण्णासाहेब शिंदे व रणजित गायकवाड या आंदोलकांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी माळशिरस तालुक्यातून २५ हजार मराठाबांधव मुंबईत गेले. परिस्थिती जाणून घेण्यासाठी आंदोलनातील बागेचीवाडी येथील रणजीत गायकवाड व बिजवडी येथील अण्णासाहेब शिंदे यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, आम्हाला मुंबईत शिरल्यापासूनच अडचणींना तोंड द्यावे
लागले. येथे झोपणे, शौचालय, अंघोळीची मूलभूत सुविधा नाही. या परिसरातील हॉटेल्स व इतर खाद्याची दुकाने बंद आहेत. मुंबईतील किंवा आसपासच्यांनी काही खाणे व पिण्यासाठी बाटल्या वगैरे आणायचे म्हटले तरी वेळेवर येता येत नाही. महापालिकेने या परिसरातील वीज, पाणीपुरवठा बंद केला. शौचालये बंद केल्याचे सांगण्यात येते. सतत पावसाने थांबायला जागा नाही.
आझाद मैदानावर सगळीकडे चिखल असल्याने झोपता व बसता येत नाही. मुंबईकर मराठा बांधव ठेचा भाकरी, पिठले पुरवत आहेत. त्यांना रहदारीमुळे येण्यास वेळ लागत आहे. जे लोक शिधा घेऊन आले आहेत त्यांना स्वयंपाक बनवण्यास जागा नाही. त्यामुळे या आंदोलकांना अन्न, पाणी, निवारा, झोप आदी सुविधा नसल्याने मुंबईतील मराठा बांधावरील अन्याय संपला नसल्याचे दिसून येते.