गोंधळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात अकलूज प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा
गोंधळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात अकलूज प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
गोंधळी समाज हा मागासलेला समाज असून गेली अनेक वर्ष शासकीय योजने पासून वंचित राहिलेला आहे.भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाली तरीही या समाजाचा आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक विकास झाला नाही.या समाजाच्या विविध मागण्यांसाठी माळशिरस तालुक्यातील सकल गोंधळी समाजाच्या वतीने अकलूज प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला .
युवा नेते महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक ते प्रांत कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला.त्यात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातुन समाज बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.समाजाच्या वतीने प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात आपल्या उपजीविकेसाठी हा समाज गावोगावी भटकंती करत आहे. महाराष्ट्रात ६० लाख लोक संख्येत हा समाज असून या समूहाची अद्याप कोणीही दखल घेतली नाही.त्यामुळे समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आल्याचे महेश शिंदे म्हणाले .यामध्ये गोंधळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, ॲट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा लागु करण्यात यावा,समाजातील भूमिहीन वंचित व दुर्बल घटकास प्रति कुटूंब ५ एकर जमिन देण्यात यावी,समाजातील मुलां-मुलींसाठी मोफत शिक्षण देण्यात यावे, तालुकास्तरीय स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावे,गृह चौकशीच्या आधारे सरसकट जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या व अशा विविध मागण्या घेऊन प्रांत कार्यालयावर समाजाच्या वतीने भव्य क्रांती मोर्चा काढण्यात आला.या मोर्चास अशोक माने,अनिल माने,संजय माने यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पाठिंबा देण्याकरीता अखिल भारतीय गोंधळी समाजाचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत भिसे,उत्तम वाघमोडे,शाहिर राजु वाघमारे,विष्णु भोरे,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते उत्तमराव जानकर, माळशिरसचे माजी सरपंच विकास धाईंजे,आरपीआय आठवले गट मिलिंद सरतापे, किरण धाईंजे,नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटन दत्ता कांबळे,महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रमुख किरण साठे,स्वाभिमानी शेतकरी संघटना अजित बोरकर, मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संजय वाघमोडे,शंकर मस्के, केंद्रीय मानवाधिकार संघटन रणजीत सातपुते,सकल धनगर समाज आप्पासाहेब देशमुख, मागासवर्गीय मुस्लिम समाज अल्ताफ पठाण यांनी प्रत्यक्षरीत्या येऊन पाठिंबा दिला.
या मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम गोंधळी समाज बांधव उपस्थित होते.हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी गोंधळी समाजाचे युवा नेते बाबासाहेब माने, प्रदीप वाघमारे,लखन काळे,योगेश माने, विनोद पवार,आदित्य माने,विष्णू इंगळे, निलेश माने,सचिन उगाडे, सुभाष काळे व इतर गोंधळी समाजातील सर्व बांधव यांनी अति परिश्रम घेतले.