रणजीतसिंह मोहिते पाटील यांची सावध भूमिका भाजपमधील स्थान पक्के करण्यासाठी हालचाली
रणजीतसिंह मोहिते पाटील यांची सावध भूमिका भाजपमधील स्थान पक्के करण्यासाठी हालचाली
संचार वृत्त अपडेट
माळशिरस मतदारसंघातील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार राम सातपुते हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा भाजपमध्ये फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मोहिते पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून राम सातपुते यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली होती. जानकर यांच्या पाठीशी मोहिते पाटील यांचा भरभक्कम पाठिंबा होता. त्यामुळे जानकर यांनी राम सातपुते यांचा १३ हजार १४७ मतांनी पराभव केला. मोहिते पाटलांची मोठी ताकद विरोधात असूनही माळशिरसमध्ये सातपुते यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. पराभवानंतर राम सातपुते हे मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सातपुते यांनी लावून धरली आहे.सातपुते यांच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची शिफारस केली आहे. फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार श्रीकांत भारतीय यांनीही रणजितसिंहांच्या हकालपट्टीबाबत भाष्य केले आहे. भाजपचे नेतेमंडळी विरोधात आक्रमक होत असताना रणजितसिंह सावध खेळी करत आहेत. भाजपमधून हकालपट्टी मागणी होत असताना मोहिते पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. भाजपमधील स्थान पक्के करण्यासाठी हालचाली त्यांनी सुरू केल्याचे या भेटीवरून दिसत आहे