solapur

रयतेचा राजा शिवछत्रपती महानाट्यातून उलगडला शूरवीरांचा इतिहास..

रयतेचा राजा शिवछत्रपती महानाट्यातून उलगडला शूरवीरांचा इतिहास..

रयतेचा राजा शिवछत्रपती महानाट्यातून उलगडला शूरवीरांचा इतिहास…

संचार वृत्त अपडेट

संग्रामनगर(केदार लोहकरे)हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त दिनांक ०२ व ०३ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या रयतेचा राजा- राजा शिवछत्रपती या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकार्यांच्या पराक्रमांचा ज्वलंत इतिहास उलगडला.हजारों रसिकांनी याला भरभरुन दाद दिली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती अकलूज,शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना कामगार वर्ग यांचे वतीने श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकूल, अकलूज येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुलक्षणादेवी मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कांचनमालादेवी मोहिते पाटील या बंधूंच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.त्यांना चांदीची तलवार व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने चांदीचा लेझीम भेट देण्यात आला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,सौ ऋतुजादेवी मोहिते पाटील,सौ सुमित्रादेवी खानविलकर,कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,चि.सयाजीराजे मोहिते पाटील,व्हा.चेअरमन शंकरराव माने देशमुख,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या सत्काराला उत्तर देताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,मागील पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.त्यापैकी बरेच जण आज अस्तित्वात नाहीत.त्यांच्यामुळेच मी माझ्या आयुष्यातील काही चांगल्या गोष्टी करू शकलो. रयतेचा राजा शिवछत्रपती हे केवळ करमणुकीसाठी नाट्य नाही,तर यातून आपण चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांनी लाखमोलाचे सहकारी निर्माण केले.छत्रपती शिवाजींनी रयतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली व त्यांच्या पश्चात ती २७ वर्ष धगधगत राहिली. शिस्त,कष्ट,जिद्द व स्वाभिमान हे या नाटकातून शिकले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात ज्वलंत देशभक्ती निर्माण व्हावी यासाठीच या महानाट्याचे आयोजन केले.सर्वांनी स्वाभिमान टिकवण्यासाठी शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारले पाहिजेत.
या महानाट्यासाठी क्रीडा संकुलवर उभारलेल्या १२५ फुट लांब व ७० फुट रुंद अशा भव्य रंगमंचावर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चित्रपट कलावंत शंतनू मोघे, जिजाऊंच्या भुमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य, बाजी प्रभूंच्या भुमिकेत अभिनेते रवींद्र कुलकर्णी आणि अफजल खानाच्या भूमिकेत अभिनेते विश्वजीत फडते गावच्या पाटलाच्या भूमिकेत प्रा.धनंजय देशमुख यांच्यासह स्थानिक ९०० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. याचे लेखक युवराज पाटील, दिग्दर्शक अभिनेते अजय तपकिरे,सुत्रधार डॉ.विश्वनाथ आवड होते.


शिवजन्मपूर्व कालापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे महत्वाचे प्रसंग या महानाट्यातून साकारले.यात अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी,स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व जिजाऊ माँसाहेब यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न, शिवजन्म- बारसे,बालशिवाजीचे शिक्षण, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, रांजाच्या पाटलाला सुनावलेली शिक्षा,प्रतापगडावरील पराक्रम, पन्हाळ्याहून सुटका, शिवा काशिदचे व बाजीप्रभूचे आत्मबलीदान,बहलोल खानाचा प्रसंग व सेनापती प्रतापराव गुजर यांची आत्माहुती,गड आला पण सिंह गेला व शेवटी शिवराज्याभिषेक इत्यादी प्रसंग हुबेहूब साकारले.यामधील पायदळ व घोडदळाचा प्रत्यक्ष सहभाग यामुळे या महानाट्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button