अकलूज न.प.विविध करांच्या आकारणीमुळे जनता त्रस्त तर नेते प्रचारात व्यस्त

अकलूज न.प.विविध करांच्या आकारणीमुळे जनता त्रस्त तर नेते प्रचारात व्यस्त
मतदारांचे बारीक लक्ष घरपट्टी कोणता पक्ष कमी करणार याकडे?
संचार वृत्त अपडेट
अकलूजच्या इतिहासातील पहिलीच नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक आहे.संपुर्ण सोलापूर जिल्ह्याचे या निवडणुकीवर लक्ष लागून राहिले आहे.त्यामुळे सर्वच पक्षांची प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे.सर्वच पक्ष अकलूजच्या विकासाच्या मुद्यावर बोलत असताना.अकलूज नगरपरिषदेच्या विविध करांची आकारणीमुळे जनता त्रस्त झाली आहे.त्यामुळे मतदारात निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज ग्रामपंचायतीला संबोधले जात होते.त्यावेळी अकलूजची जनता सुखी,आनंदी व गुण्यागोविंदाने रहात होती.त्यामुळे या ग्रामपंचायतीचा विकास एखाद्या नगरपरिषदेला लाजवेल असा झाला होता.त्यामध्ये अकलूजचा इतिहास कालीन तटबंध भोईकोट किल्ला मोडकळीस व पडीक होता.त्यावेळेस ग्रामपंचायतीने सुधारणा करून एका उद्यानात रूपांतर केले.आज हा किल्ला इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे.अकलूज ग्रामपंचायतीचा ऑलिम्पिक साईजचा जलतरण तलाव संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे.पुर्वीच्या काळी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने बांधलेला हा पहिलाच जलतरण तलाव आहे.विझोरी येथील आठ ते दहा किलोमीटरवरून पाणी पुरवठा योजनेचे पाणी संपुर्ण अकलूज शहराला मिळत आहे.सुशिक्षीत तरूणांना व्यवसाय करण्यासाठी शाॅपिंग सेंटर उभा केली आहेत.त्यामुळे अकलूजच्या जनतेला ग्रामपंचायतीचा अभिमान वाटत होता.पण काही वर्षांपुर्वी ग्रामपंचायतीने अमरावती येथील एका कंपनीला घर मोजणीचे काम दिले होते तेथून पुढे घरपट्टी वाढ होण्यास सुरुवात झाली.
अकलूजच्या नागरिकांना ऐवढ्या सुखसोई उपलब्ध असताना. विकासाला निधी कमी पडतो म्हणून अकलूजच्या नागरिकांनी नगरपरिषद होण्यासाठी अकलूज प्रांताधिकारी कार्यालया समोर ४३ दिवस साखळी उपोषण करण्याची वेळ आली.त्यानंतर अकलूज नगरपरिषद अस्तित्वात आली.पण तीन चार वर्ष निवडणुक न झाल्यामुळे प्रशासकीय काळात अकलूजकरांना विविध कराची आकारणी लावून त्यावर दरमहा दोन टक्केनी व्याज आकारल्यामुळे अकलूजची जनता खूपच त्रस्त झाली आहे.दोन वर्षांपूर्वी अकलूज नगरपरिषदेने थकीत घरपट्टी वसुलीसाठी अकलूजच्या नागरिकांना माळशिरसच्या न्यायालयात आदालातमध्ये केसेस दाखल करून अकलूजमधील ७० ते ८० वर्षांच्या जेष्ठ नागरिकांना कोर्टाची पायरी चढायची वेळ आली.त्याच्याकडून व्याजासह घरपट्टी वसूल केली आहे.वास्तविक पहाता महाराष्ट्र शासनाने जेष्ठ नागरिकांना खूप सवलती दिल्या आहेत.या लोक आदालतमध्ये मुख्यमंत्री यांच्या लडक्या बहिणींकडून ही व्याजासह कर वसूल केला आहे.अशा वेळी कोणत्याच नेत्यांनी किंवा राजकीय पक्षाने नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे अकलूज नगरपरिषदेबद्दल नागरिकांतून नाराजी पसरली आहे.त्यामुळे भिक (विकास) नको पण कुत्र (करांचे) आवर म्हणायची वेळ अकलूजकरांवर आली आहे.त्यामुळे ४३ दिवस साखळी उपोषण कशासाठी केले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.अकलूज नगरपरिषद अस्तित्वात आली असली तरी अकलूजचा विकास नाही तर अकलूजचे भकास झालेले चित्र दिसून येत आहे.मग नगरपरिषदेचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी केला हा नागरिकात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक नगरपरिषद नगरपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टीवरील दंड व व्याज माफ व्हावे यासाठी आमदार दिलीप सोपल यांनी अर्थ संकल्प आधिवेशनात तारांकित प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधले व राज्य सरकारने लगेच लक्ष घालून दंड व व्याज माफ करून अभय योजना लागू करायचा निर्णय घेतला आहे.पण अकलूज नगरपरिषद मात्र अजून ही दरमहा दोन टक्के व्याज आकारून कर वसूल करत आहे त्यामुळे या निवडणुकीत मतदाराचा कौल कोणच्या बाजूने असेल ते आताच कोणी सांगू शकत नाही.




