अकलूज मध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा,सुरक्षा,पारदर्शी व्यवहारामुळे घोडे व्यापाऱ्यांचे दोन महिने अगोदरच आगमन

अकलूज मध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा,सुरक्षा,पारदर्शी व्यवहारामुळे घोडे व्यापाऱ्यांचे दोन महिने अगोदरच आगमन
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथे मिळणाऱ्या सोयीसुविधा, सुरक्षा, खात्रीचे गिऱ्हाईक व पारदर्शी व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, बरेली, हरियाणासह संपूर्ण भारतातून मारवाड व पंजाब जातीचे १५० देखणे, चपळ घोडे यावर्षी प्रत्यक्ष बाजाराच्या दोन महिने अगोदरच अकलूजमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी २४ घोड्यांची विक्री होऊन २५ लाखांची उलाढाल सुद्धा झाली आहे.
येथील घोडे बाजाराला प्रत्यक्ष दीपावली पाडव्याला सुरुवात होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्यासाठी सुमारे १५ एकर जागा राखून ठेवली आहे. तेथे गर्द सावली देणाऱ्या चिंचेच्या झाडांची लागवड केली आहे. मागील १६ वर्षात ही
झाडेही चांगलीच बहरली आहेत. त्यातून घोडे बांधण्यासाठी दावण आखली आहे. आत-बाहेर जाण्यासाठी प्रशस्त रस्ते, घोडे नाचवणे, पळवण्यासाठी विस्तीर्ण पटांगण ठेवले आहे. पाण्याची व विजेची २४ तास सोय आहे. बाजाराच्या आवारात मच्छर हटवण्यासाठी दररोज सायंकाळी फवारणी केली जाते. जनावरांच्या डॉक्टरांची सुविधा दिली जाते, तसेच घोड्यांच्या शृंगार साधनांच्या दुकानासाठी आणि व्यापाऱ्यांना चहापाणी, अल्पोपहारासाठी हॉटेलसाठीही भरपूर जागा जागा उपलब्ध करून दिली आहे. या घोड्यांना लागणारा सुका चारा, खुराकाची व्यापारी सोय करतात. मात्र शहरातील गरीब महिलांनी पुरवलेल्या गवतामुळे त्यांच्या ओल्या चाऱ्याची ही सोय होते. शिवाय या महिलांना रोजगारही उपलब्ध होतो.

हा बाजार पूर्वीपासून पंढरपूर येथे कार्तिकी वारीच्या वेळी भरत होता. तेथे प्राथमिक सोयी सुविधा मिळत नसल्या तरी व्यापारी परंपरेने जात होते. तेथे घोडे पळवून नेणे, दमदाटी, दादागिरीसारख्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून त्यांना हुसकावून लावले. परप्रांतीय व्यापाऱ्यांना आधार नसल्याने त्यांनी अकलूज येथील माजी जि. प. अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांच्याशी संपर्क साधत अडचणी सांगितल्या. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून त्यांनी त्यावेळी अकलूज येथे जागा व सुविधा केली. तेंव्हापासून व्यापाऱ्यांनी दरवर्षी अकलूजलाच येणे पसंत केले. गत १६ वर्षांपासून हा बाजार येथे भरत आहे.
बाजारात घोड्याची विक्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदणीची अधिकृत संगणकीकृत पावती त्यांना दिली जाते. त्यावर घोड्यासह दोन्ही मालकांचे फोटो, वायद्याच्या तारखा नमूद असतात. अशा रितीने पारदर्शी व्यवहारासह बाजार आवारात सुरक्षेची सोय केली जाते.त्यामुळे घोडे चोरून, पळवून नेणे, दमदाटी करणे आदी प्रकार घडत नाहीत. त्यामुळे अकलूजचा बाजार व्यापाऱ्यांना देशभरात सुरक्षित वाटतो. हा बाजार प्रत्यक्ष दिवाळी पाडव्याला सुरू होत असला तरी त्याअगोदरच व्यापारी घोडे घेऊन येतात. बाजार संपल्यावरही महिनाभर थांबतात.



