संत तुकाराम पालखी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

संत तुकाराम पालखी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथून जवळच असणारा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व त्याला जोडणारा अकलूज येथून येणाऱ्या लातूर ते सातारा महामार्गावर सतत वर्दळ असते. परंतु या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग किवा महामार्ग विभागाने गतीरोधकही टाकले नाही. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत.टेंभुर्णी कडून येणाऱ्या नवीन प्रवाशांना अकलूज हुन येणारा बायपासला जोडलेला रोड माहित होत नाही.
पुणे येथून येणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग सध्या पूर्ण झाला आहे. नीरा नदी पलीकडे पुणे जिल्ह्यातील सराटी येथे या मार्गावर टोलनाका असून तेथे गतीरोधक आहे. तेथून पुढे या महामार्गावर गतीरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जातात. याच मार्गाला अकलूजनजीक पूर्वेला पश्चिमेकडून येणारा सातारा लातूर हा महामार्ग मिळतो. या मार्गांच्या संगमाठिकाणी तीव्र चढ आहे. तसेच गतीरोधकही नाही. त्यामुळे अकलूजकडून येणारी वाहने वेगात येतात. मात्र, त्याला पूर्वेकडून पालखी महामार्गावरून वेगात येणारी वाहने दिसत नाहीत. दोन्ही वाहने आपापल्या बाजूने असली तरी ज्या ठिकाणी हे मार्ग मिळतात, त्याठिकाणी ती अचानक एकमेकांसमोर येतात व अपघात होतात. अकलूज येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन विभागीय कार्यालये आहेत. अपघात स्थळापासून बांधकाम विभागाचे कार्यालय केवळ एका किलोमीटरवर असूनही गतीरोधक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी अद्याप गतीरोधक उभारले नाही. या ठिकाणी नुकताच दुचाकीत अपघात होऊन कुर्डुवाडी येथील एक कीर्तनकार ठार झाले आहेत. तर त्यांच्या पत्नींना कायमचे क्रियांगत्व आले. त्याला अद्याप एक महिनाही झाला नसताना पुन्हा रविवारी मालट्रक व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु सततचा हा प्रकार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाकीमुळे वैतागलेल्या नागरिकांनी रोडवरच ठिय्या मांडून दोन्ही महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी रोखली होती. त्यानंतर अकलूज पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी समजूत काढली होती. परंतु तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या अपघातस्थळी गतीरोधक उभारले नाही.
गतीरोधक न उभारल्यास आंदोलन करणार
लातूर-सातारा व पालखी महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. मालवाहतूक वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु येथे गतीरोधक नसल्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे येथे गतीरोधक व अंडरपासची गरज आहे. गतीरोधक केले नाही धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा संघटना आंदोलन उभारणार.
अण्णासाहेब शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष, जनसेवा संघटना.

