दहीगाव येथे कोर्टाचा ‘स्टे’ झुगारुन दादागिरी

दहीगाव येथे कोर्टाचा ‘स्टे’ झुगारुन दादागिरी
माळशिरस तालुक्यात खळबळ
अकलूज डीवायएसपींकडून तपास सुरू कुटुंबाला अमानुष मारहाण
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील दहीगाव (फुलेवस्ती) येथे न्यायालयाचा स्थगिती आदेश (डींगू जीवशी) असतानाही बेकायदेशीरपणे मुरूम टाकून रस्ता बनवणाऱ्या दबंगांनी, त्यांना जाब विचारणाऱ्या एका अनुसूचित जातीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या टोळक्याने घरात घुसून वृद्ध सासू-सासरे आणि लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. इतकेच नव्हे तर, वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेचा हात धरून ओढाओढ करत विनयभंग केला आणि अत्यंत अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात दहीगाव परिसरातील ११ जणांविरुद्ध विनयभंग, दंगल आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण माळशिरस तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गंभीर प्रकार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० ते ९:३० वाजण्याच्या सुमारास दहीगाव ते कुरबावी जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत, शेती गट नंबर ११४६ मध्ये घडला. या शेत जमि नीतील रस्त्याबाबत न्यायालयात वाद सुरू असून कोटनि त्यावर स्थगिती आदेश (स्टे) दिलेला आहे. असे असतानाही, आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर रित्या टिप्परच्या साहाय्याने तिथे मुरूम टाकण्यास सुरुवात केली.या बेकायदेशीर कृत्याबाबत फिर्यादी संध्याराणी ज्ञानेश्वर माने (वय ३८, रा. फुलेवस्ती, दहीगाव, ता. माळशिरस) आणि त्यांच्या कुटुंबाने कोर्टाचा स्टे आहे, तुम्ही इथे मुरूम टाकू नका, असे नम्रपणे सांगितले.याचा तीव्र राग मनात धरून आरोपींच्या हिंस्त्र टोळक्याने माने यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी महिला, तिचे पती, वृद्ध सासू-सासरे आणि लहान मुलांना हाताने व लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.मारहाण सुरू असताना फिर्यादी संध्याराणी माने या आपल्या कुटुंबाला सोडवण्यासाठी मध्ये गेल्या. त्यावेळी आरोपी रणजित फुले आणि धनाजी ढगे यांनी फिर्यादीचा हात धरून जबरदस्तीने ओढाओढ केली. आरोपींनी फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या नराधमांनी अत्यंत नीच पातळीवर जाऊन जाहीर शिवीगाळ केली.आणि तिथेच थांबल्यास गंभीर परिणाम भोगण्याची व जीवे मारण्याची धमकी (दम दाटी) दिली. या भयानक प्रसंगानंतर पीडित महिला संध्याराणी माने यांनी पोलीस घेऊन फिर्याद दिली. सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता (इछड) २०२३ च्या कलम ११५ (२), १८९(२), १९०, १९१(१), १९१(३), ३५१(२), ३५२, ७४ आणि ट्रॉसिटी कायद्याच्या कलमांचा समावेश आहे. घटनेचा पुढील तपास अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः करत आहेत. सर्व आरोपी अद्याप मोकाट असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
यांच्यावर गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणी एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये १) भीमराव सदाशिव फुले (वय ४५), २) रणजित भीमराव फुले (वय ३५), ३) धनाजी पांडुरंग ढगे (वय ४४), ४) शंकर पांडुरंग ढगे (वय ३५), ५) पांडुरंग बाळू ढगे (वय ३०), ६) पोपट सोपान ढगे (वय ४७), ७) अरुण पोपट ढगे (वय २७), ८) भीमराव बाळू ढगे (वय ५१), ९) किरण ज्ञानदेव नाकुरे (वय २५), १०) सचिन तात्यासो काटकर (वय २७) आणि ११) एका अज्ञात इसमाचा समावेश आहे.
दहीगावच्या त्या गुंडांना कायद्याचा डर उरला नाही का?
न्यायालयात खटला सुरू असताना, ‘स्टे ऑर्डर’चा कागद हातात असतानाही भरदिवसा शासकीय आदेशाची अंमलबजावणी न करता थेट गुंडशाही करणे, हा लोकशाही आणि कायद्याचा उघड अवमान आहे. स्वतःला भागातले सर्वेसर्वा समजणाऱ्या या ११ जणांनी कुटुंबाला ज्या अमानुषपणे घरात घुसून मारहाण केली ते पाहता माळशिरस तालुक्यात ‘खाकी’चा वचक संपला आहे का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे. अकलूजचे डीवायएसपी या प्रकरणात आरोपींना तात्काळ बेड्या ठोकून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार का, याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!



