रुंदीकरणाचे स्वागत पण नियोजनाचा बोजवारा ! पावसाळ्यापूर्वी काम होईल का ? अकलूजकरांची प्रशासनाला विचारणा

महर्षी चौक:रुंदीकरणाचे स्वागत पण नियोजनाचा बोजवारा !
पावसाळ्यापूर्वी काम होईल का ? अकलूजकरांची प्रशासनाला विचारणा
संचार वृत्त अपडेट
महर्षी चौकातील रुंदीकरण व सुशोभीकरणाच्या कामाचे नागरिकांनी स्वागत केले आहे, परंतु या कामाच्या ढिसाळ नियोजनामुळे सध्या अकलूजकर मेटाकुटीला आले आहेत. खडी, दगडांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत.बायपास (सर्विस रोड) रस्ता तयार न करताच थेट मुख्य चौक खोदल्याने शहराची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.


“महर्षी चौकाचे काम चांगले आहे, पण ते सुरू करण्याआधी पर्यायी बायपास (सर्विस रोड) डांबरीकरण करून वाहतूक वळवायला हवी होती. अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. सध्या सर्व वाहने प्रांत कार्यालय व वैभव गांधी दवाखाना जवळच्या रस्त्यावरून वळवण्यात आली आहेत. मात्र, हे दोन्ही रस्ते मोठमोठ्या खड्ड्यांनी, दगडांनी व खडी हतरल्यामुळे पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. रस्त्यावर दोन ते तीन फूट खोल खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वार पडत आहेत, गाड्यांचे नुकसान होत आहे. रस्त्यावरून दुहेरी वाहतूक जात असल्याने तासन्तास कोंडी होत आहे. रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस अडकून पडत आहेत.खडीमुळे प्रचंड धूळ उडत असून व्यापारी व रोड लगतच्या रहिवाशांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.जून महिना तोंडावर आला असून पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. “पाऊस पडला तर हा संपूर्ण परिसर चिखलाचा दलदलीत रूपांतरित होईल. मग काम कधी पूर्ण होणार? शाळा-ऑफिसला जायचे कसे?” असा सवाल पालक व नोकरदार वर्ग करत आहे. रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून ताबडतोब बुजवावेत व रोलर फिरवावा.महर्षी चौकाचे काम दोन शिफ्टमध्ये करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. नियोजनशून्य कामामुळे नागरिकांचे हाल करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
जून तोंडावर आलाय. 15 दिवसांत पाऊस सुरू झाला तर हे खोदलेले चौक व खड्डे भरलेले पाणी बायपास म्हणजे चिखलाचे साम्राज्य होईल. मग शहर 4 महिने ठप्प? अधिकारी AC केबिनमध्ये बसून फाईली हलवतात, पण फिल्डवर येऊन जनता काय भोगतेय ते बघत नाहीत.DTP प्लॅनमध्ये बायपासचा रस्ता आधी तयार करून मग मुख्य काम सुरू करणे बंधनकारक असताना तो नियम का पाळला नाही? कामाची मुदत किती? पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला दंड व काळ्या यादीत टाकणार का? प्रांत ऑफिस कडे जाणाऱ्या रोडवर मुरूम, खडी टाकून रोलर फिरवणार का? की फक्त आश्वासनांचा रोलर फिरणार? असे प्रश्न जबाबदार नागरिक विचारु लागले आहेत.
नागरिकांची गैरसोय टाळायला हवी
नियोजन म्हणजे नुसती कागदावरची रेषा नव्हे! महर्षी चौकाचे काम म्हणजे ‘पहले मुर्गी या अंडा’चा प्रकार चांगला बायपास न करता थेट खोदकाम म्हणजे नागरिकांचे हाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महर्षी चौक रुंदीकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे या रस्त्यावरून जाताना प्रवाशांची मोठी कसरत होत आहे. “विकास हवा, पण नियोजनशून्य कारभार नको.महर्षी चौकाचे सुशोभीकरण गरजेचे आहे, यात दुमत नाही. आम्ही स्वागतच केले. पण प्रांत कार्यालय रोड व वैभव गांधी दवाखाना हा रस्ता म्हणजे आज ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. दोन-दोन फूट खड्डे, रस्त्यावर हथरलेली खडी त्यातून रुग्णवाहिका, कर्मचारी,शाळेंची मुले, व्यापारी वर्ग,स्कूल बसेस, नोकरदार यांना जावे लागत आहे. ही कसली नियोजनबद्धता? नागरिकांचे गैरसोय लवकरच टाळायला हवी अमोल माने (सरचिटणीस,भाजप अकलूज शहर)



