भ्रष्टाचाराचा महामार्ग झाला!पालखी मार्गावर काम न करताच लाटली बिले

भ्रष्टाचाराचा महामार्ग झाला!पालखी मार्गावर काम न करताच लाटली बिले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्फोटक आरोप
घोटाळ्याची चौकशी होणार का ?
संचार वृत्त अपडेट
संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्ग महामार्गाच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटने केला आहे. “काम न करताच ठेकेदारांनी बिले लाटली आणि प्रशासनाने डोळेझाक केली असा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दुरुस्ती, रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काम झालेच नाही, तरीही कागदोपत्री काम दाखवून ठेकेदारांनी सरकारी तिजोरीतून पैसे उचलले. शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले, वारीच्या वेळी रस्त्याची अवस्था बिकट होणार.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, “हा संत तुकाराम महाराजांच्या नावाचा अवमान आहे. वारीसाठी लाखो वारकरी चालतात, त्यांच्यासाठी रस्ता व्हावा यासाठी निधी दिला. पण तो पैसा ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या खिशात गेला. काम न करता बिले उचलणे हा उघडउघड घोटाळा आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी व ठेकेदार-काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.पालखी मार्गावरील सर्व कामांचे तृतीयपंथी ऑडिट करून प्रत्यक्षात किती काम झाले याचा हिशोब द्यावा.पैसे वसूल करा: काम न करता बिले उचलणाऱ्या ठेकेदारांकडून कोट्यावधी रुपये व्याजासहित वसूल करावेत.संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या (९६५ G) कामात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तरंगवाडी (वेताळबाबा मंदिर): येथे ७०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याचे दाखवून पैसे लाटले आहेत, मात्र प्रत्यक्ष काम झालेले नाही. या रस्त्यामुळे अनेक अपघातांत नागरिकांना जीव गमवावा लागला असून, शालेय विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
शेळगाव ब्रिज येथील पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे दाखवून त्याचे पूर्ण पेमेंट उचलण्यात आले आहे.इंदापूर (पुणे-सोलापूर हायवे) बारामती चौक येथील १६०० मीटर रस्त्याचे काम न करताच ठेकेदाराने पैसे काढले आहेत.
अशा अनेक ठिकाणी सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचे काम कागदोपत्री दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप संघटनेने केला आहे.या भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांवर दोन दिवसांच्या आत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कडक कारवाई करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संबंधित कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन, रास्ता रोको छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या गंभीर आरोपांनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे मुकेश कुमार सिंग यांनी तात्काळ कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले मात्र, निवेदन मिळाल्यानंतर चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
शेतकरी गप्प बसणार नाही
आम्ही वारीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला सहन करणार नाही. जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पालखी मार्गावरच रास्ता रोको ठिय्या आंदोलन करेल शेतकरी गप्प बसणार नाही.
अजित बोरकर, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना



