solapur

नावात काय ठेवलय ? अस्मिता ठेवलीय !

नावात काय ठेवलय ? अस्मिता ठेवलीय !

माळेवाडी जोडून नगरपरिषद झाली मग नाव अकलूज माळेवाडी का नाही ?

लोक भावनांचा विचार करून माळेवाडीच्या योगदानाचा सन्मान वाढवा

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगरपरिषदेचे नामकरण ‘अकलूज-माळेवाडी नगरपरिषद’ असे करावे, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याकडे सादर केले.3 ऑगस्ट 2021 रोजी शासन निर्णयानुसार माळेवाडी हे गाव अकलूज गावाला जोडून अकलूज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. माळेवाडीच्या नागरिकांनी, शेतजमिनीने व हद्दीने नगरपरिषद मोठी झाली. तरीही फक्त ‘अकलूज’ नाव ठेवल्याने माळेवाडीच्या अस्मितेला धक्का बसत आहे, असा दावा भाजपने केला आहे.निवेदनात   “महाराष्ट्रात इतर ठिकाणी दोन गावे जोडून नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका झाल्यावर दोन्ही गावांची नावे संयुक्तपणे दिली जातात.
उदा. ‘महाळुंग -श्रीपूर ,पिंपरी-चिंचवड महापालिका’, ‘इचलकरंजी-हुपरीनगरपरिषद,सांगली मिरज आणि कुपवाड शहर नगरपालिका त्या धर्तीवर अकलूज नगरपरिषदेचे ‘अकलूज-माळेवाडी नगरपरिषद’ असे नामकरण करणे न्याय्य व ऐतिहासिकदृष्ट्या योग्य ठरेल.असे म्हटले आहे.माळेवाडीच्या जनतेने नगरपरिषदेसाठी जमिनी दिल्या, कर भरला. मग नावात स्थान का नाही? हा माळेवाडीकरांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी हा प्रस्ताव तातडीने सर्वसाधारण सभेत मांडून शासनाकडे पाठवावा,” अशी मागणी शिष्टमंडळाने केली.3 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयाची व महाराष्ट्रातील इतर उदाहरणांची पडताळणी करून हा प्रस्ताव नियमानुसार नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेपुढे ठेवावा सभेच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णयासाठी शासनाकडे पाठवावा अशी मागणी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका जयश्री एकतपुरे,नगरसेवक महेश शिंदे ,अकलूज मंडल सरचिटणीस अमित टिळेकर, ग्रामस्थ संजय एकतपुरे,संजय खुडे,नवनाथ साठे,अतुल बनकर,लहू सुगावकर आदींनी मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याकडे केली.

• दोन्ही गावामधिल बंध अधिक घट्ट होतील

हा केवळ नावाचा मुद्दा नाही, तर माळेवाडीच्या लोकांच्या भावना, त्यांचा स्वाभिमान आणि इतिहासाचा सन्मान याचा प्रश्न आहे,”
माळेवाडीच्या जमिनी, माणसे आणि कररूपी योगदानामुळे आज नगरपरिषदेचा विस्तार झाला आहे. अशा परिस्थितीत फक्त ‘अकलूज’ नाव ठेवणे म्हणजे माळेवाडीकरांच्या भावनांशी खेळ करणे आहे.प्रशासनाने राजकारण बाजूला ठेवून लोकभावनांचा विचार करावा. मुख्याधिकारी सचिन पाटील हे जनभावना जाणणारे अधिकारी आहेत. त्यांनी हा प्रस्ताव तातडीने सर्वसाधारण सभेत मांडून माळेवाडीकरांना न्याय द्यावा. नामकरणातूनच खऱ्या अर्थाने ‘सबका साथ’ होईल. हे नामकरण कुणाला कमीपणा आणण्यासाठी नाही, तर एकात्मतेचे प्रतीक आहे. अकलूज आणि माळेवाडी एकत्र येऊन मोठी झाली, तर नावातही ती एकत्र आली पाहिजे. यातून दोन्ही गावांमधील बंध अधिक घट्ट होतील.
अमित टिळेकर, सरचिटणीस भाजप अकलूज मंडल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button