नोकरी नाही, स्वतःचा ब्रँड ! लोहकरे परिवाराचा तिसऱ्या पिढीचा आदर्श ; शिवतेजिंह मोहिते पाटील

नोकरी नाही, स्वतःचा ब्रँड ! लोहकरे परिवाराचा तिसऱ्या पिढीचा आदर्श ; शिवतेजिंह मोहिते पाटील
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ‘केदार लोहकरे फोटो अँड फिल्म्स’च्या ऑफिसचा थाटात शुभारंभ
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर )
माळशिरस तालुक्यात फोटोग्राफी क्षेत्राबरोबरच पत्रकारिता क्षेत्रात गेली चार दशके अखंडपणे नावाजलेले आणि विश्वासाचे नाव म्हणजे अकलूज येथील लोहकरे परिवार. वृत्तपत्र छायाचित्रकारिता आणि फोटो अँड व्हिडिओच्या क्षेत्रात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लोहकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. या परिवाराची परंपरा आता तिसऱ्या पिढीकडे यशस्वीरित्या हस्तांतरित झाली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह या क्षेत्रात तिसरी पिढी दमदार पदार्पण करत आहे. याचाच एक भाग म्हणून अकलूजमध्ये ‘केदार लोहकरे फोटो अँड फिल्म्स’ या भव्य आणि अत्याधुनिक ऑफिसचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
सोलापूर जिल्ह्यातील विविध नामांकित दैनिक वृत्तपत्रांमधून रंगीत आणि बातमीदार छायाचित्रे प्रसिद्ध करून अत्यंत कमी कालावधीत स्वतःचा ठसा उमटवणारे कै. शरदराव लोहकरे यांनी १९८८ साली या व्यवसायाचा पाया रचला. त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र संजय शरदराव लोहकरे आणि राजीव शरदराव लोहकरे यांनी अत्यंत कुशलतेने आणि निष्ठेने पुढे चालवला. बातम्या आणि लोहकरे हे जणू अतूट नाते निर्माण झाले आहे. कोणतीही बातमी असो, लोहकरे यांचा कॅमेरा तिथे असतोच, अशी ओळख संपूर्ण तालुक्यात आहे. आता याच परंपरेला पुढे नेत संजय लोहकरे यांचे चिरंजीव केदार संजय लोहकरे यांनी अकलूजमध्ये अत्यंत कमी कालावधीत आपल्या कामाच्या जोरावर नावलौकिक मिळवला असून, त्यांनी सुरू केलेल्या नव्या स्टुडिओमुळे या परंपरेत आधुनिकतेची भर पडली आहे.
या नव्याने सुरू झालेल्या ‘केदार लोहकरे फोटो अँड फिल्म्स या ऑफिसचा उद्घाटन सोहळा अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील आणि सोलापूरचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष युवा नेते शिवतेजसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, भारत मगर, लक्ष्मीकांत कुरूडकर, नौशाद मुलाणी, तुकाराम उबाळे (मास्तर), अकलूज शहर फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ माने, उपाध्यक्ष कादर शेख, रणजीत एकतपुरे, शुकूर तांबोळी, जमीर तांबोळी यांच्यासह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि लोहकरे परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, “लोहकरे परिवाराने फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय म्हणून न करता एक सेवा म्हणून जपला आहे. कै. शरदरावांपासून ते केदारपर्यंत ही तिसरी पिढी या क्षेत्रात येणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता केदारप्रमाणे स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून स्वतःबरोबर इतरांनाही रोजगार द्यावा.
या ऑफिसमध्ये सर्व आधुनिक सेवा उपलब्ध असणार आहेत. शिवापूर पेठ, अकलूज येथे हे ऑफिस सुरू झाले आहे.लोहकरे परिवाराच्या या नव्या वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



