solapur

माळी शुगरच्या गाळप हंगामापूर्वीच शंभर रुपये वाढीव हप्ता मागणीचा सूर

माळी शुगरच्या गाळप हंगामापूर्वीच शंभर रुपये वाढीव हप्ता मागणीचा सूर

 शेतकरी संघटनेचे अजित बोरकर यांच्या सोबत शेतकऱ्यांची बैठक

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

सन २०२६-२७ च्या गाळप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर कारखान्याच्या वाढीव हप्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना वाढीव शंभर रुपयांचा हप्ता द्यावा, या मागणीवरून शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये माळीनगर येथे बैठक संपन्न होऊन चर्चा झाली असून मागणी मान्य न झाल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी यंदाची दुष्काळी परिस्थिती, ऊस उत्पादनात झालेली घट, वाढता उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, विलास इनामके, पुष्कर इनामके,समीर पांढरे, गणेश बोरावके,हेमंत रासकर,चंद्रकांत जगताप,संजय रासकर, अनिकेत गिरमे,पुष्कराज जाधव आदी उपस्थित होते.यंदा अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने उसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. पाणीटंचाई, उत्पादन खर्चातील वाढ आणि अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याची भावना शेतकऱ्यांनी अजित बोरकर यांच्यासमोर व्यक्त केली.अशा परिस्थितीत कारखान्याने शेतकऱ्यांना वाढीव शंभर रुपयांचा हप्ता द्यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली. यंदाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसे येणे गरजेचे असून, कारखान्याने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना वाढीव शंभर रुपयांचा हप्ता दिल्याचेही शेतकऱ्यांनी अजित बोरकर यांच्या निदर्शनास आणून दिले. इतर कारखाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून वाढीव रक्कम देत असतील, तर माळी शुगरनेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शंभर रुपयांचा वाढीव हप्ता द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, ऊस उत्पादन खर्च वाढत असताना आणि यंदा उत्पादनावर परिणाम झाला असताना वाढीव हप्ता हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.सध्या शेतकऱ्यांमध्ये वाढीव हप्त्याची मागणी जोर धरत असून, या मागणीवर कारखाना प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच हा प्रश्न मार्गी लागल्यास हंगाम सुरळीत सुरू होण्यास मदत होऊ शकते.मात्र, मागणीबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची भूमिका घेतली जाऊ शकते, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील इतर कारखान्याच्या गाळप हंगामावर या प्रश्नाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

गाळप हंगाम जवळ येत असतानाच वाढीव हप्त्याचा प्रश्न निर्माण झाल्याने माळी शुगरचे धुराडे वेळेत पेटणार की शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे गाळप हंगामाला विलंब होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, यंदाची दुष्काळी पार्श्वभूमी, कमी झालेली उसाची वाढ आणि जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी दिलेला वाढीव हप्ता या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.हंगामाची सुरुवात संघर्षाने होण्यापेक्षा शेतकरी आणि कारखाना प्रशासन यांच्यात समन्वयातून तोडगा निघणे गरजेचे आहे. अन्यथा यंदाचा गाळप हंगाम ऊसाच्या गोडव्यापेक्षा आंदोलनाच्या संघर्षामुळे कडू होण्याची शक्यता आहे.आता कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या शंभर रुपयांच्या वाढीव हप्त्याच्या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button