दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ऊस उत्पादकांना दिलासा द्या! प्रतिटन १ हजार रुपये अनुदान द्यावे : जयसिंह मोहिते-पाटील

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ऊस उत्पादकांना दिलासा द्या!
प्रतिटन १ हजार रुपये अनुदान द्यावे : जयसिंह मोहिते-पाटील
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील वाढते आर्थिक संकट लक्षात घेता, सहकारी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिटन १ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात जयसिंह मोहिते-पाटील बोलत होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालक सुहास यादव, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविकात कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे सांगितले. उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करून यंदाच्या हंगामातील उद्दिष्ट पूर्ण करण्याचा कारखान्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांना दर देताना सहकार महर्षी साखर कारखाना कुठेही कमी पडणार नाही. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून सहकारी कारखान्यांना खासगी कारखान्यांशीही स्पर्धा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त ऊस गाळप करून उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना अत्याधुनिक करण्यात येणार आहे.दरम्यान, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ११ टक्के दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



