भाविकांची वाट खड्डेमय;अकलाई मंदिर परिसरातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

भाविकांची वाट खड्डेमय;अकलाई मंदिर परिसरातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
अकलूज नगरपरिषद हद्दीतील ग्रामदैवत श्री अकलाई देवी मातेचा नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. मात्र, अकलाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या तसेच परिसरातील काटेरी झुडपे व अस्वच्छतेमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवरात्रोत्सवापूर्वी या समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अकलूज शहर उपाध्यक्ष जतिन वायदंडे यांनी केली आहे.याबाबत वायदंडे यांनी अकलूज नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जयसिंगराव खुळे यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि भाविकांना सुरक्षित व सुकर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.अकलाई मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून या मार्गावर सतत वाहनांची तसेच भाविकांची वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नवरात्रोत्सवात गर्दी वाढणार असल्याने हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे.मंदिराच्या भिंतीलगत असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीस तसेच भाविकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे संबंधित झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.याशिवाय ओढ्याच्या परिसरासह मंदिराच्या आजूबाजूला वाढलेली काटेरी झुडपे व तण काढून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि भाविकांसाठी सोयीस्कर ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सध्या निर्माण झालेल्या या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजविणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आणि परिसराची स्वच्छता करणे ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर निवेदन आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी भाजप अकलूज शहर सरचिटणीस अमोल माने, भाजप युवा मोर्चा अकलूज शहर उपाध्यक्ष जतिन वायदंडे, दत्तात्रय खंडागळे, मयूर म्हेत्रे, शुभम सपताळे, आकाश पवार, अविनाश सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



