
ऊस नेण्यावरून बारामती अँग्रो ला संघर्षाचा इशारा !
रोहित पवारांच्या बारामती अँग्रो कार्यालयाला ठोकले कुलूप
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
सोलापूर जिल्ह्यात ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच जिल्ह्यातील ऊस बारामती ॲग्रो कारखान्याकडे नेला जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे-सोलापूर महामार्ग परिसरातील रांजणी येथील बारामती ॲग्रोच्या कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कार्यालयाला कुलूप ठोकले. ऊस परिषदेत दराबाबत निर्णय होईपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ऊस नेऊ नये, अशी मागणी करत संघटनेने कारखाना प्रशासनाला इशारा दिला आहे. यावेळी अजित बोरकर,सचिन पाटील, तानाजी बागल,शहाजान शेख,सचिन आटकळे,निवास नागणे,मगन काळे,मेजर नेमचंद शिंदे, कैलास इंगळे, उमेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी योग्य ऊसदरासाठी आंदोलन करत असताना जिल्ह्यातील ऊस बाहेरील कारखान्यांकडे वळविण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.अशा प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार कमी होण्याची शक्यता असून, आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे का(?असा सवालही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.बारामती ॲग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील ऊस नेण्याबाबत सुरू असलेल्या हालचालींकडे लक्ष द्यावे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत जिल्ह्यातील ऊस इतरत्र नेण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या लढ्याला बाधा येऊ नये, ही संघटनेची भूमिका असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ऊस परिषदेकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या परिषदेत ऊसदरासंदर्भात जो निर्णय होईल, त्यानंतरच सोलापूर जिल्ह्यातील ऊस नेण्याबाबत पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.परिषदेतील निर्णयापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील ऊस नेण्याचा प्रयत्न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संघर्ष करावा लागेल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. तसेच बारामती ॲग्रोशी संबंधित ऊसतोड

टोळ्या आणि ट्रॅक्टर यांनी सोलापूर जिल्ह्यातील कामकाज तातडीने थांबवून जिल्ह्याबाहेर जावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
ऊसदराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि सुरू असलेल्या आंदोलनाला बाधा येऊ नये यासाठी बारामती ॲग्रोने सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.दरम्यान, बारामती ॲग्रोच्या कार्यालयाला कुलूप ठोकून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे ऊसदराचा प्रश्न आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संघटनेच्या मागण्यांवर बारामती ॲग्रो प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.



