खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची तांदुळवाडी कर काढणार हत्तीवरून मिरवणूक
खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची तांदुळवाडीकर काढणार हत्तीवरून मिरवणूक तांदुळवाडी पंचायत समिती सदस्य खासदार झाल्याबद्दल होणार सन्मान
तांदुळवाडी (डी.एस.गायकवाड)अकलूजमधील उपसरपंच,सरपंच, पदाचा काळ पाहिल्यानंतर तांदुळवाडी गावातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या तालुक्याच्या राजकारणाला सुरुवात केली.पंचायत समिती सदस्य होऊन ते सभापती झाले. इथून पुढे त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. जिल्हा पातळीवर काम करून ते आता खासदार झाल्याने त्यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळा बुधवार दिनांक १४ रोजी विजय पवार युवा मंच तांदुळवाडी आणि पंचक्रोशीतील मोहिते पाटील समर्थकांनी आयोजित केला असून यावेळी त्यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
राजकारणाची पहिली कर्मभूमी ठरलेल्या तांदुळवाडी गावावर नेहमीच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे आजपर्यंत विशेष प्रेम राहिले आहे. एवढेच नव्हे तर अगदी सहकार महर्षी काळापासून मोहिते पाटील कुटुंबाने तांदुळवाडी करांबरोबर एक वेगळा जिव्हाळा जपला आहे. सहकार महर्षींनी तांदूळवाडी गावात पहिल्यांदा जर्सी गाईंचे वाटप केले होते. तेव्हापासून जिल्ह्यामध्ये आजतागायत तांदुळवाडी हे गाव दूध उत्पादनात अग्रेसर समजले जाते. विजय प्रताप युवा मंचच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूजचे उपसरपंच, सरपंच झाले त्यानंतरच्या काळात त्यांनी पहिल्यांदाच तांदुळवाडीकरांच्या आग्रहास्तव पंचायत समिती निवडणूक लढवली आणि त्यांच्या तालुक्याच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यात त्यांना तांदुळवाडी पंचायत समिती गणाने विक्रमीमताने निवडून दिले.तदनंतर त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करून तिथे आपल्या कामाची चुणूक दाखवली. तत्पूर्वी तांदुळवाडी पंचायत समिती गणाचे ते सदस्य झाल्यानंतर त्यांना सभापती पदाची संधी मिळाली त्यावेळी तांदूळवाडी परिसरात अक्षरशा विकास कामांचा पाऊस पडला. नेहमीच तांदुळवाडीकर मोहिते पाटील कुटुंबाच्या सक्षमपणे पाठीशी राहिले आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, मार्केट कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खा.धैर्यशील मोहिते पाटील आणि समस्त मोहिते पाटील कुटुंबाला नेहमीच तांदुळवाडीबद्दल विशेष स्नेह राहिलेला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात ज्यावेळेस माळशिरस तालुक्यातील १६ गावांचा समावेश होता त्यावेळेस देखील मोहिते पाटलांच्या आदेशाने स्व.गणपतराव देशमुख यांना निवडून देण्यामध्ये तांदुळवाडी आणि पंचक्रोशीतील लोकांनी मोलाची भूमिका पार पाडली. धैर्यशील मोहिते पाटील पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर तांदूळवाडीचा कायापालट झाला.विविध विकासकामांच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी या पंचकृषिला अक्षरशा नटवले. आणि आता ते खासदार झाल्याने पंचायत समिती सदस्य सभापती ते खासदार अशा त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्याचे तांदुळवाडी आणि पंचक्रोशीतील लोकांनी योजले आहे. बुधवार दिनांक १४ रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला असून यावेळी हत्तीवरून त्यांची मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांनी यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
———————————————–
समस्त मोहिते पाटील कुटुंब नेहमीच तांदूळवाडी आणि पंचक्रोशीच्या पाठीशी खंबीरपणे आजपर्यंत उभे राहिले आहे.विकास कामासंदर्भात या भागाला नेहमीच झुकते माप मिळाले आहे. विविध स्थानिक पातळीवरील अडीअडचणींना सुद्धा मोहिते पाटलांनी निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.तांदुळवाडीकरांनी धैर्यशीलभैयांच्या पंखात बळ भरण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाला आणखी मजबूत करण्यासाठी पंचायत समिती लढवण्याची आग्रही भूमिका मांडली. त्यांच्यामुळे तांदूळवाडी गणाला सभापती पदाची संधी २००७ मध्ये प्राप्त झाली. तदनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील तांदूळवाडी पंचायत समिती गणातून त्यांना भरघोस मताची आघाडी देखील देण्यात आली आहे. त्यामूळे मोहिते पाटील आणि तांदुळवाडीकर यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट व्हावेत यासाठी तांदळवाडी पंचक्रोशीच्या वतीने खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
ॲड.विजय पवार,
संचालक, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सा.कारखाना, शंकरनगर अकलूज