शंकरनगरच्या श्रावणी सोहळ्यात हजारो महिलांनी लुटला पारंपारिक खेळाचा आनंद
शंकरनगरच्या श्रावणी सोहळ्यात हजारो महिलांनी लुटला पारंपारिक खेळाचा आनंद
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरात श्रावणमासा निमित्त महाशिवरात्र यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रावणी सोहळ्यात हजारों महिला,मुलींनी पारंपारिक खेळाचा आनंद लुटला. हा सोहळा म्हणजे महिलासाठी आनंदाची पर्वणीच ठरली. महाशिवरात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सोहळ्याचे आयोजक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
माळशिरस तालुक्यात पारंपारिक खेळ व पारंपारिक कला जोपासण्याचे काम जयसिंह मोहिते पाटील यांनी सातत्याने केलेले आहे.श्रावणात महिलांना मुलींना हेच पारंपारिक खेळ खेळता यावेत,महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जावी या हेतुने शंकरनगरच्या शिवपार्वती मंदिरात खास महिलांसाठी श्रावणी सोहळ्याचे आयोजन केले होते.या करिता मंदिर परिसरात महाशिवरात्र यात्रा कमिटीच्या वतीने विशेष सुविधा उपलब्ध केली होती.दिनांक २५ ऑगस्ट रोजी पारंपारिक वेषात सुमारे ५ हजार महिला एकत्र आल्या.व त्यांनी सोहळ्यात झोके,फुगडी,झिम्मा,काटवट काना,घागरीसूप नाचवणे या पारंपरिक खेळासह संगीताच्या तालावर मुक्तछंदपणे आनंद लुटला.
दिनांक १ सप्टेंबरला पंचमीचा आनंद घेत महिलांनीच दहीहंडी देखील फोडली.सर्व उपस्थितांना समितीच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.तर विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही सवलतीच्या दरात उपलब्ध केले होते.दिनांक १ सप्टेंबर रोजी या सोहळ्यात सुमारे ८ हजार महिला मुलींनी पारंपारिक खेळ खेळले.
यावेळी सौ सुलक्षणादेवी मोहिते पाटील,कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,कु.कृष्णप्रिया मोहिते पाटील यांनीही पारंपारिक खेळात सहभागी होऊन उपस्थित महिलांचा उत्साह वाढविला. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी सायंकाळी ७ वाजता मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. सदरची आरती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,सौ.ऋतुजादेवी मोहिते पाटील,कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सह हजारों भक्तगण उपस्थित होते.या महाआरतीने श्रावणी सोहळा २०२४ ची सांगता झाली.