ऊस गाळप धोरणावर मंत्री समितीची बैठक
हंगामाच्या वेळापत्रकावर होणार उद्या शिक्कामोर्तब
ऊस गाळप धोरणावर मंत्री समितीची बैठक
राज्यातील मागील वर्ष २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि यंदाच्या २०२४-२५ च्या गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक उद्या, सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात दुपारी चार वाजता बोलाविण्यात आली आहे. त्यामध्ये हंगाम कधी सुरू करायचा? याची तारीखनिश्चिती होणार असून, यंदाचा हंगाम १ नोव्हेंबर किंवा १५ नोव्हेंबरपासून सुरू करायचा, यावर बैठकीत शिक्कामोर्तब होईल. राज्यात गतवर्ष २०२३-२४ चा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला होता, तर यंदाचा २०२४-२५ चा हंगाम १ किंवा १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर निर्णय अपेक्षित आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रतिटन दहा रुपयांप्रमाणे करण्यात येणाऱ्या कपातीचा मुद्दा प्राधान्याने चर्चेत येईल. साखर कारखान्यांकडून या महामंडळासाठी अद्याप १५८ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम दिल्याशिवाय साखर कारखान्यांना यंदाचा ऊस गाळप परवाना देण्यात येऊ नये, असा निर्णयही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
—————————————
१०.२५ टक्के उताऱ्यासाठी प्रतिटन ३४०० रुपये दर
केंद्र सरकारने हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी रास्त आणि किफायतशीर किमत १०.२५ टक्के तर बेसिक साखर उताऱ्यासाठी प्रतिमेट्रिक टन ३४०० रुपये निश्चित केली आहे. १०.२५ टक्क्यांच्या पुढे ०.१ टक्का उताऱ्यासाठी प्रतिटन ३३.२० रुपये आणि १०.२५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ९.५० टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असेल, तर ०.१ टक्क्यासाठी ३३.२० रुपये प्रतिटन असा दर आहे. तर, ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रतिमेट्रिक टन ३१५१ रुपये दर जाहीर केलेला आहे.