संविधान स्तंभ उभारण्यासाठी मोहीम गायकवाड यांचे आमरण उपोषण
संविधान स्तंभ उभारण्यासाठी मोहीत गायकवाड यांचे आजपासून अकलूज येथे आमरण उपोषण.
संग्रामनगर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभारण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम यामधून निधी अनुज्ञेय करण्यात यावा किंवा विशेष बाब म्हणून घेण्यात यावा. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन झाले पाहिजे या व इतर मागण्यांसाठी मोहीत गायकवाड हे दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून मागण्या मान्य होईपर्यंत अकलूज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारी आमरण उपोषणास बसणार आहेत.
खा.सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई/खास/मंत्री/5177/21 दि.25 जानेवारी 2021 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय व निमशासकीय जागेची निवड करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेसह स्तंभ उभे करण्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्र दिले होते. अरुण गणपती लाड विधान परिषद सदस्य यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब सदस्य तथा सचिव जिल्हा नियोजन समिती,सांगली यांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत त्यांच्या मतदार संघातील मौजे अकलूज (ता.माळशिरस जि.सोलापूर) येथे संविधान स्तंभ उभारणेकामी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत रूपये 7 लाख देण्याची शिफारस दि.26/12/2023 रोजी केली होती.परंतु सदर शिफारसीचे गांभीर्य मुख्यमंत्री व अर्थमंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी घेतले नाही.
भारतीय संविधानाची निर्मिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य व समता चळवळीच्या मंथनातून पुढे आलेल्या मूल्यांवर करण्यात आली.भारतीय समाजाने स्वतःसाठी घेतलेली ही शपथ आहे.त्याचे स्मरण सर्वांनी करुन भविष्यातील वाटचालीची दिशा निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.प्रत्येक भारतीयाने राज्यघटनेच्या न्याय,स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे पालन करणे हे कर्तव्य आहे.तरच सक्षम आणि सुजाण भारतीय नागरिक तयार होऊ शकेल.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची ही घटना तयार केली. यातून प्रत्येक भारतीयाला मूलभूत अधिकार आणि हक्क मिळाले.याची माहिती पुढील पिढीलाही व्हावी व त्याचे महत्त्व समजावे.यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभारण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम यामधून निधी अनुज्ञेय करण्यात यावा.यासाठी मोहीत गायकवाड यांनी दि. २/१/२०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिलेले होते.परंतु अद्यापपर्यंत याबाबत काही दखल घेण्यात आली नाही म्हणून मोहीत गायकवाड या संविधान विरोधी सरकारच्या विरोधात मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.