मुलींची सुरक्षा व कायदा व्याख्यान संपन्न
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांचे वतीने मुलींची सुरक्षा व कायदा व्याख्यान संपन्न
संचार वृत्तसेवा–
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांचे वतीने स्मृतीभवन शंकरनगर येथे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी *मुलींची सुरक्षा व कायदा व्याख्यान हा उपक्रम घेण्यात आला.
मुलींची सुरक्षा हा मुलींचा हक्क आहे आणि हीच जाणीव निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख अतिथी स्वरूपाराणी मोहिते पाटील संचालिका शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, प्रमुख व्याख्यात्या अॅड. हसीना शेख, हर्षवर्धन खराडे पाटील सहसचिव शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, अश्विनी माने सदस्य प्रशाला समिती लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर उपस्थित होते.महर्षि प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर ,लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता पवार व बालमंत्रिमंडळाच्या चमूने मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रमुख व्याख्यात्या अॅड हसीना शेख यांचा सत्कार करण्यात आला.
मुलींची सुरक्षा, बाल लैंगिक शोषण, मोबाईलचा अतिवापर यांसारख्या कारणांतून मुलींची सुरक्षा ऐरणीचा विषय बनल्याचे स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकातून व्यक्त केला. आयुष्याची जबाबदारी स्वतः घेऊन सकारात्मक विचारांची मनात पेरण करण्याचे आवाहन विद्यार्थिनींना यावेळी करण्यात आले.
प्रमुख व्याख्यात्या हसीना शेख यांनी मुलींशी मनसोक्त हितगुज साधत मुलींना येणाऱ्या समस्या, वेगवेगळ्या घटना व त्यासंबंधी असणारे कायदे आपल्या व्याख्यानातून सांगितले.
मुलींशी हितगुज सदरात विद्यार्थिनींच्या मनात असणाऱ्या प्रश्नांना त्यांनी वाट मोकळी करून दिली. विद्यार्थिनींच्या प्रत्येक शंकेचे निरसन व्याख्यानादरम्यान करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता सारे जहासे अच्छा या समूहगीताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू व नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार अनिता पवार यांनी मानले.