दूषित पाणी सोडणाऱ्या वर राज्यपाल कार्यालयाचे व पर्यावरण विभागाचे चौकशीचे आदेश

दूषित पाणी सोडणाऱ्या वर राज्यपाल कार्यालयाचे व पर्यावरण विभागाचे चौकशीचे आदेश
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील मौज अकलूजमधील निरा नदीमध्ये व मौजे पुरंदावडे गावाच्या हद्दीत दूषित पाणी सोडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.तसेच दूषित पाणी कुठून येत आहे,हे माहिती असूनही कारवाई न करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर विभागाचे जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी दिले होते.राज्यपाल यांनी महाराष्ट्र शासनाला तात्काळ कारवाईचे आदेश न दिल्यास २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार राज्यपाल कार्यालयाच्या अवर सचिव करुणा वावडणकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे अवर सचिव यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच अकलूजमधील दिनांक ४ फेब्रुवारी पासून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने मुंबई येथील मंत्रालयासमोर असलेल्या आझाद मैदानात १० फेब्रुवारी पासून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते.आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे अवर सचिव श्री निलेश पोतदार यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सोलापूर उपप्रादेशिक अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या नदी बचाव आंदोलनाची दखल घेवून राज्यपाल कार्यालय व महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने आदेश दिल्याने चौकशीला गती मिळाली आहे.तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे हे दूषित पाणी सोडणाऱ्यावर कारवाई करीत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे साठेंनी सांगितले.