व्यसनमुक्तीची वारी- पांडुरंगाच्या दारी व्यसनमुक्त युवक संघाच्या या उपक्रमास वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

व्यसनमुक्तीची वारी- पांडुरंगाच्या दारी व्यसनमुक्त युवक संघाच्या या उपक्रमास वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
संचार वृत्त अपडेट
श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने वेगवेगळे अभंग, ओव्या तसेच अनेक विषयाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार केला जातो. पालखी सोहळ्यात वाढत चाललेले व्यसनाधीनता यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असल्याने हा उपक्रम राबवण्यात येतो. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व्यसनांचे दुष्परिणाम दाखवणारे फलक,माहितीपत्रक, प्रबोधिका या माध्यमातून व्यसनांची दाहकता, वारकऱ्यांसमोर मांडली जाते. ‘नका खाऊ, तंबाखू नका लावू चुना- माणसाचा जन्म नाही पुन्हा, गुटखा मावा कधी ना खावा-वाटते का तुम्हाला कॅन्सर व्हावा. अशा वाक्याच्या माध्यमातून, कविता,भारुड तसेच पाळणा,पथनाट्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना प्रबोधन करण्याचे कार्य या सोहळ्यामध्ये व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते करत आहेत. व्यसनमुक्ती बरोबरच गोरक्षा,वृक्ष संवर्धन, सेंद्रिय शेती, निर्मलग्राम, पर्यावरण जनजागृती या विषयावरतीही प्रबोधन केले जाते.
या उपक्रमाचे अनेक फडकरी,दिंडी चालक,विषेश करुन महिलांनी कौतुक केले.
आळंदी देहू पासून व्यसनमुक्त युवक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय पराडे,तुकाराम कुंभार,सुरेश मगर,राजेंद्र कानडे,तानाजी पांडुळे शंभूराजे सुर्यवंशी, सचिन पराडे हे परीश्रम घेत आहेत. यावेळी राज्य अध्यक्ष दीपक जाधव,उपाध्यक्ष नवनाथ मालुसरे, समाधान सूर्यवंशी, पोपटराव जमदाडे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
व्यसनमुक्ती युवक संघाचे प्रा. धनंजय देशमुख म्हणाले, व्यसनमुक्ती अभियानाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभाग सर्व पातळीवर आटोकाट प्रयत्न करत आहे परंतु याला म्हणावे असे यश सामाजिक पातळीवर मिळताना दिसत नाही परंतु जेष्ठ किर्तनकार युवक मित्र ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून गेली १७ वर्ष आळंदी- पंढरपूर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये तसेच मागील ७ वर्षांपासून देहू-पंढरपूर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात व्यसनमुक्तीचे वारकऱ्यांना प्रबोधन केले जाते आणि याचा सकारात्मक परिणाम या सोहळ्यामध्ये दिसून येत आहे. कित्येक स्त्री-पुरुष व्यसने सोडण्याची माऊली व तुकोबारायांच्या साक्षीने शपथ घेतात.