नदीकाठी सतर्कतेचा इशारा उजनीचे सतरा तर वीर चे नऊ दरवाजे उघडले उद्यापासून पाऊस ओसरणार

नदीकाठी सतर्कतेचा इशारा उजनीचे सतरा तर वीर चे नऊ दरवाजे उघडले उद्यापासून पाऊस ओसरणार
संचार वृत्त अपडेट
घाटमाथा, भीमा व निरा खोन्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून वरील धरणांमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे उजनी व वीर प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून यामुळे बुधवारपासून भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहणार आहे.
मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून उजनी धरणातून वीज निर्मितीसह ४१ हजार ६०० तर निरा नदीवरील वीर प्रकल्पातून ४७ हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तत्पूर्वी वीरमधून ३३ हजार क्युसेकचा सुरू होता. तर उजनी धरणातून सकाळपासून भीमा नदीत सांडव्याद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत हा विसर्ग वाढवून चाळीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला होता. तो रात्री साडेआठ वाजता ६० हजार करण्यात आला.भीमा खोरे व घाटमाथा परिसरात होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उजनी जलाशयात येण्याची शक्यता आहे. खडकवासला साखळी धरण परिसरात होत असलेल्या पर्जन्यमानामुळे खडकवासला धरणातून २४ हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. त्याचबरोबर पवना, चासकमान यासारख्या प्रकल्पांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. त्यामुळे उजनीत येणारी आवक वाढत असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजता दौंडची आवक आठ हजार क्यूसेक होती, मात्र ती बुधवारी सकाळपर्यंत कमालीची वाढणार आहे.धरण १०५.२५ टक्के भरले असून धरणात १२० टीएमसी एकूण पाणीसाठा आहे. यातील उपयुक्त पाणी हे ५६.३९ इतके आहे. दरम्यान, बोर व उजनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे
उद्यापासून पाऊस ओसरणार
सध्या महाराष्ट्रात बरसत असलेला पावसाचा जोर गुरुवार, २१ ऑगस्टपासून कमी होईल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. उद्या (बुधवार) पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील, मात्र गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरत जाईल.
उजनीचे १७ तर वीरचे ९ दरवाजे उघडले
भीमा खोऱ्यातून उजनी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता उजनीचे १७ दरवाजे उघडून नदी पात्रात ६० हजारांचा विसर्ग सुरू केला. वीजनिर्मितीतून १६०० क्युसेक पाणी नदीपात्रात मिसळत होते. वीर धरणाचे ९ दरवाजे उघडून ४७ हजार ३५० क्युसेकने पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. या दोन्ही धरणातील १ लाख ७हजार क्युसेक पाण्याचा परिणाम उद्या बुधवारपासून नदीकाठी जाणवण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्षात याहून अधिक पाणी असण्याची शक्यता आहे.