आजच्या पिढीने आई-वडील आणि गुरुजनांचा मान राखावा; भालचंद्र कांबळे
आजच्या पिढीने आई-वडील आणि गुरुजनांचा मान राखावा.वयोवृध्द भालचंद्र कांबळे यांची अपेक्षा
कोल्हापूर (केदार लोहकरे यांजकडून) “आजची पिढी प्रसारमाध्यमांच्या विकृत प्रभावामुळे आई-वडील व शिक्षकांना नाकारतात.त्यांच्या अशा दुर्वर्तनामुळे आईवडिलांवर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. तरी आजच्या तरुण पिढीने आई – वडील व गुरुजनांचा मान राखावा,”अशी अपेक्षा मिरज येथील वृध्दाश्रमवासी भालचंद्र कांबळे यांनी येथे आपल्या जीवनाची व्यथा उलगडताना व्यक्त केली.
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र(बी.एड.कॉलेज)महाविद्यालयाच्या विद्यार्थी-शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून येथील सांजसावली वृद्धाश्रमास भेट दिली.त्याप्रसंगी बी.एड.च्या विद्यार्थी-शिक्षकांनी वृद्धव्यक्तींशी मुक्तपणे संवाद साधला.यावेळी विद्यार्थी-शिक्षकांनी प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते वृद्धांना फळे दिली.याप्रसंगी सियोन सियान फाऊंडेशनचे विश्वस्त अविनाश महापुरे यांनी वृद्धाश्रमाचा खर्च संस्थापक डॉ. प्रशांत जमने स्वतः तसेच लोक वर्गणीतून करतात असे सांगितले. यावेळी सावित्री गायकवाड, दशरथ कांबळे (कोडोली) आणि मंदाकिनी बाजीराव चोपडे (पुणे) या वृध्दाश्रमवासियांनी आपल्या जीवनाचा दुःखपट उलगडला.यावेळी वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापिका प्राजक्ता महापुरे यांनी वृध्दाश्रमाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
या वृध्दाश्रम भेटीचे संयोजक प्रा.एस.डी.रक्ताडे यांनी भेटी मागचा हेतू विशद केला व आभार प्रदर्शन केले.याप्रसंगी विद्यार्थी-शिक्षकांसमवेत प्रा. श्रीमती गुलनास मुजावर,प्रा. संजय जाधव,प्रा.ए.के.बुरटुकणे, कार्यालीन अधीक्षक एस.के. पाटील,ग्रंथपाल विशाल शेवाळे आणि सेवक तानाजी मोहिते आदी उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने भेटीची सांगता झाली.