solapur

डीसीसी निवडणुकीत नवे समीकरण ! संख्या बळाचा नवा खेळ

डीसीसी निवडणुकीत नवे समीकरण !
संख्या बळाचा नवा खेळ ?

मोहिते पाटलांच्या संपर्क दौऱ्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क ना उधाण !

संचार वृत्त अपडेट ( लक्ष्मीकांत कुरुडकर )

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) दुग्ध संस्था मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र शेवटच्या टप्प्यात बदलताना दिसत आहे. माढा तालुक्याने माळशिरस तालुक्याला ओव्हरटेक करत या मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या मिळविल्याने आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माढा तालुक्यातील ६२ सहकारी दूध संस्थांना अवसायनात काढण्याचा आदेश दुग्ध विभागाच्या उपनिबंधकांनी दिला होता. मात्र, या आदेशाला पुणे येथील दुग्ध विभागाच्या विभागीय सहनिबंधकांनी स्थगिती दिल्याने संबंधित संस्थांच्या मतदार प्रतिनिधींचे ठराव करण्याचा मार्ग मोकळा झाला. परिणामी माढ्याच्या मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.या मतदारसंघातून सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आतापर्यंत प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यावेळी मतदारसंघातील संख्याबळाचे समीकरण बदलल्याने आगामी निवडणुकीत नव्या समीकरणातून नवा उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी डीसीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पणन-प्रक्रिया, बँका-पतसंस्था व इतर संस्था तसेच दुग्ध संस्था अशा चार मतदारसंघांमध्ये मतदार प्रतिनिधींचे ठराव केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच मतदारसंघनिहाय संख्याबळ स्पष्ट होऊ लागले आहे.डीसीसीच्या विविध मतदारसंघांतील एकत्रित संख्याबळात माढा तालुका ७५ मतदारांसह आघाडीवर आहे. माळशिरस तालुक्यात ५९ मतदार आहेत. त्यानंतर सांगोला ३१, पंढरपूर १२, मोहोळ १०, बार्शी ७, मंगळवेढा ५, करमाळा ४ आणि दक्षिण सोलापूर १ मतदार अशी संख्या आहे. उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्याचा आकडा शून्य असून एकूण मतदारसंख्या २०४ आहे डीसीसीच्या पणन-प्रक्रिया मतदारसंघात ८६ पैकी माळशिरसचे १९, तर माढ्याचे १८ मतदार झाले आहेत. बार्शीचे १२ मतदार असून इतर तालुक्यांची संख्या त्यानंतर आहे. दुग्ध आणि पणन मतदारसंघात माढा तालुक्याने केलेल्या दमदार एन्ट्रीमुळे डीसीसीच्या निवडणुकीतील पारंपरिक समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.यामुळे माळशिरस तालुक्याचे राजकीय वजन आता मुख्यतः सोसायटी मतदारसंघात किती प्रभावी ठरते, याकडे लक्ष लागले आहे. माळशिरसचे संख्याबळ कोणत्या आघाडीच्या बाजूने उभे राहते, यावर आगामी निवडणुकीतील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीत माढा तालुक्याच्या वाट्याला दोन संचालकपदे आली होती. यावेळी मतदारसंघातील माढ्याचे वाढलेले संख्याबळ पाहता तालुक्याच्या वाट्याला किती संचालकपदे येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच सोसायटी मतदारसंघाव्यतिरिक्त माढ्याला आणखी कोणत्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व मिळणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.डीसीसी बँकेची निवडणूक ही पक्षीय झेंड्यांपलीकडची निवडणूक म्हणून ओळखली जाते. यापूर्वी विविध पक्षांच्या नेत्यांचे डीसीसीच्या राजकारणात अनेकदा सूर जुळले होते. मात्र, त्यातील अनेक ज्येष्ठ नेते आता वयोमानाने थकले असून काही नेते दिवंगत झाले आहेत. त्यामुळे नव्या फळीतील नेत्यांचे सर्वपक्षीय राजकीय सूर कसे जुळतात, यावर आगामी निवडणुकीतील चुरस अवलंबून राहण्याची शक्यता आहे.बदललेले मतदारसंघीय संख्याबळ, माढ्याची वाढलेली ताकद, माळशिरसचे पारंपरिक वर्चस्व आणि नव्या नेतृत्वाची जुळवाजुळव या सर्व पार्श्वभूमीवर डीसीसी निवडणुकीचे पडद्यामागील राजकारण आता अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर मा.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि विविध घटकांशी संपर्क वाढविल्याचे चित्र असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विविध नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संवाद साधल्याने त्यांच्या या दौऱ्यांची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली, विविध गटांतील अंतर्गत मतभेद तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या शक्यता यामुळे या भेटीगाठींना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून विविध पातळ्यांवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील विविध भागांत संपर्क वाढवून स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या काळात गोरे आणि मोहिते-पाटील गटातील राजकीय संघर्षही चर्चेत आला होता.जिल्ह्यातील स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि विविध राजकीय घटकांशी वाढणारा संवाद आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरत आहे.मोहिते-पाटील कुटुंबाचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात विविध राजकीय गटांकडून संघटनात्मक पातळीवर संपर्क वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. माढा परिसरातील राजकीय भेटीगाठी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
जिल्ह्यातील तालुक्यातील सलग दौरे आणि स्थानिक पातळीवरील भेटीगाठी  मोहिते-पाटील पुन्हा जिल्ह्यातील राजकीय संपर्कव्यवस्था सक्रिय करीत आहेत का, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्यांमागील नेमकी राजकीय भूमिका अथवा आगामी निवडणुकांबाबतची रणनीती याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button